पिक्चरची तिकीट मिळाली नाही अन् गमावला जीव

0

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास वणीवरून घोन्सा येथे जाताना ऑटो पलटला. यात एका जणाचा मृत्यू झाला. तर दोघं जण यात बचावले आहेत. मद्यप्राषण करून भरधाव वेगाने ऑटो चालवत असताना चालकाचे ऑटोवरचे नियंत्रण सुटले व अपघात झाला.

सविस्तर वृत्त असे की, शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता अनिल दुर्गाप्रसाद पाल (20), आकाश विठ्ठल आस्कर (22) व गणेश मारोती राजूरकर तिघेही राहणार घोन्सा हे सिनेमा बघण्यासाठी अनिल याच्या ऑटोत बसून वणीला आले. सिनेमाची तिकीट न मिळाल्याने तिघाही मित्रांनी मद्य प्राषन केले. त्यानंतर वणीतील ग्रामीण रुग्णालया जवळ असलेल्या अकरमच्या धाब्यावर जेवण केले. 11 वाजता दरम्यान ते गावाकडे जावयास निघाले.

आकाश ऑटो चालविण्यास घेतला. त्याच्या बाजूला अनिल बसला गणेश याला अधिक दारू पिल्याने त्याला मागच्या सीटवर बसविले. वाटेत सुकनेगाव फाट्यावर आकाशने अधिक वेगाने ऑटो चालविल्याने ऑटो पलटला व काही दूर घासत गेला.

आकाश व अनिल हे यावेळी प्रसंगवधाने ऑटोतून उतरून गेले. परंतु यावेळी गणेश दिसला नाही. शोधाशोध घेतला असता गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला ऑटोत बसवून वणीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यास रेफर केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी गणेश यास मृत घोषित केले.

आकाश याने ऑटो निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालविल्याने गणेश याला जीव गमवावा लागला. त्यामुळे आकाशाच्या विरोधात अनिल याने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आकाश याच्यावर कलम 279, 304(अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.