घोन्सा येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

वळविण्यात आलेले नाल्याचे प्रवाह पूर्ववत करण्याची सूचना

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलि (WCL) प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे घोन्सा येथील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच वळविण्यात आलेले नैसर्गिक नाल्याचे प्रवाह पूर्ववत करावे. असा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वेकोलि प्रशासनाला दिला आहे. डब्ल्यूसीएलच्या चुकीमुळे घोन्सा येथील गावकरी व शेतकऱ्यांवर ओढावलेल्या कृत्रिम संकटाबाबत मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून तसेच मोबाईलवर संपर्क साधून तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती केली होती.

प्राप्त माहितीनुसार वेकोली घोन्सा प्रशासनाने कुठलीही परवानगी न घेता राज्यमार्ग खोदून अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्याच्या प्रवाह बदलला. त्यामुळे घोन्सा गावातील नागरिकांच्या घरात व शेतामध्ये पाणी भरून शेकडो हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहे. वणी घोन्सा राज्यमार्ग क्र.314 वर सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता वेकोलिने रस्ता खोदून क्षतीग्रस्त केल्यामुळे सदर रस्त्यावर दीड मीटर पाणी भरून वाहतूक 8 तास बंद होती.

वेकोलिने विदर्भ नदीच्या हद्दीत व पूर नियंत्रण रेषेच्या आत कोळसा खाणीचा ओबीआर टाकून पाण्याचा प्रवाह घोन्सा गावाच्या दिशेने वळविला. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, वाचनालय, आठवडी बाजार परिसर पुराच्या पाण्याखाली येऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. वेकोलीच्या मनमानी धोरणामुळे घोन्सा येथील नागरिकात रोष निर्माण झाला होता.

हे देखील वाचा:

Comments are closed.