विविध भारती के दोस्तो़…

आकाशवाणीची अदभूत सफर

0

विविध भारती के दोस्तो़…

‘ध्वनी तरंगो कि ताल पर आप सून रहे है विविध भारती़.. देश कि सुरिली धडकन,
और मै हूँ आपका दोस्त युनुस खान !
दिन के डेढ बज रहे है, पेश है कार्यक्रम मनचाहे गीत !’

माझ्या आयुष्यातील कित्येक दुपारची सुरुवात ही अशी ‘विविध भारती’च्या संगतीने झालीय. ‘विविध भारती के दोस्तों, दिनभर की भागदौड़ में आप कही भी रहिए, मगर रहिए विविध भारती के साथ’, उद्घोषक युनुस खान यांचा हा प्रेमळ सल्ला त्यांच्याच आवाजाची नक्कल करीत मी पाठ करून टाकला होता. इतर उद्घोषकांच्या शांत, हळुवार उद्घोषणेपेक्षा यूनुस खानचा लगबगीचा आवाज मला जास्त आवडायचा. दुपारी एक किंवा दीड वाजता माझे असे प्रेमळ स्वागत करायला कधी असायचे कमल शर्मा, अमरकांत दुबे, राजेन्द्र त्रिपाठी तर कधी निम्मी मिश्रा, अशोक सोनावणे, ममता सिंह, रेणू बंसल, शहनाज अख्तरी. सकाळी ११ वाजेपर्यंतच कॉलेज असल्यामुळे अभ्यासाचा पसारा दुपारीच मांडणे हा माझा रोजचा कार्यक्रम. पुस्तक उघडणे आणि आकाशवाणीचे यवतमाळ स्टेशन ट्यून करून विविध भारती सुरू करणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडायच्या. युनुस खान ते रेणू बंसल, कमल शर्मा ते ममता सिंह यांच्यासोबत मग माझा अभ्यास सुरू व्ह्यायचा. २००१ ते २००५ अशी चार वर्षे म्हणजे बी.ए. आणि ‘बॅचलर आॅफ जर्नालिझम’पर्यंतचा माझा होता नव्हता तितका अभ्यास असा ‘गृप स्टडी’च्या माध्यमातून झाला.


१२ वी पर्यंतचे माझे शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील आमच्या पहूर (दाभा) या गावी झाले. आपल्या वाड्याच्या माळ्यावर एका खोलीत दुपारी आपण अभ्यास करीत असतो. लगतच्या छोट्याशा चौकातील दुकानांमध्ये सुरू असलेल्या रेडीओचा अख्ख्या मोहल्ल्यात शिरलेला आवाज आपल्या खोलीतही शिरतो. ‘विविध भारती’वर हिंदी सिनेमातील नवी जुनी सर्वच गाणी ऐकायला मिळत, त्यामुळे या आवाजाने अभ्यासात डिस्टर्ब वगैरे होते अशी अंधश्रद्धा तेव्हा आमच्या गावातील एकाही विद्यार्थ्यामध्ये नव्हती. त्यामुळे या आवाजाचे माझ्या खोलीत अत्यंत भक्तीभावाने स्वागत व्हायचे. माझ्यासह इतरांचाही हा भक्तिभाव आणि श्रवनभक्तिची ओढ चौकातील किराणा दुकानदार, टेलर, चहा टपरीवाले, इलेक्ट्रॉनिक वस्तुुंची दुरुस्ती करणारे या सर्वांनाच माहित. त्यामुळे त्यांच्या मनातही दिवसभर मोठ्या आवाजात गाणी वाजविताना कुठला अपराधी भाव असण्याची शक्यता नव्हतीच. उलट गावातील लोकांचा टाईमपास करण्याचे सत्कार्य आपल्या हातून घडत आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास. त्यांच्या खात्यात हे पुण्य कर्म जमा होण्याच्या मार्गात आडवे येण्याचे पाप आपल्या खात्यावर लावण्यास कुणीही तयार नव्हते. दुपारी गावातील काही सुखी आत्मे झोप घ्यायचे. थोडेबहुत त्यांना डिस्टर्ब होतही असेल. चित्रगुप्ताचे आपल्याकडे लक्ष नाही असे गृहीत धरून ते मनातल्या मनात एखाद्या वेळी त्यांना शिव्या शाप देण्याची औपचारिकता पार पाडत होते. पण अर्थातच त्याचा काही फायदा नव्हता. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकाराला ‘साऊंड पॉल्यूशन’ असले काहीतरी म्हणतात, असे सांगणारे कुणी आमच्या गावात नव्हते.

त्या काळात आमच्या गावामध्ये बऱ्याच घरी रेडीओ होता. पण बेताचीच आर्थिक परीस्थिती असल्यामुळे बहुतेकांना रेडीओमध्ये ‘सेल’ टाकणे ही चैन परवडत नसायची. त्यात रेडीओ इलेक्ट्रिकवर करणे म्हणजे लोडशेडिंगच्या काळात रिस्क घेणेच झाले. त्यात पुन्हा सिग्नलसाठी ‘बॅण्ड’ सेट करून गाणाऱ्याच्या आवाजाला न्याय देण्याची कसरत करावी लागायची. मजेशीर गोष्ट म्हणजे, युनूस खान म्हणतात त्याप्रमाणे विविध भारतीवरील गाणी खरच ‘ध्वनी तरंगो कि ताल’वरच ऐकायला यायची. म्हणजे, हवेचा थोडा जोर वाढला कि गाणे स्पष्ट ऐकायला यायचे. नाहीतर मग नुसतीच खरखर. यातून सुटका केली ती खुद्द आकाशवाणीने. १० नोव्हेंबर १९९२ रोजी यवतमाळ एफ एम स्टेशन सुरू झाले आणि विविध भारती सेवेचे स्पष्ट प्रसारण गावात पोचले. ‘एफ एम कीट’ नावाचा प्रकार तर थेट रिचार्जेबल टॉर्चमध्येसुद्धा जाऊन बसला. त्यामुळे ‘एफएम’च्या माध्यमातून विविध भारती सेवेचे प्रसारण ‘क्लिअर आवाजात’ ऐकू येवू लागले. दुपारच्या वेळी भर उन्हात कित्येक शेतकरी, शेतमजूर हातात टॉर्च घेऊन आपल्या शिवाराकडे निघालेले दिसू लागले. आमच्या गावातील लोकांचा टाईमटेबल ‘विविध भारती’च्या कार्यक्रमांच्या वेळेवर ठरायला लागला. दुपारी १ ते सायंकाळी ५ या दरम्यान प्रसारित होत असलेले ‘हिट-सुपरहिट, मनचाहे गीत, सदाबहार नगमे, सखी सहेली आणि ‘पिटारा’अंतर्गत हॅलो फर्माईश, आज के महेमान, सेहतनामा, सरगम के सितारे, बाईस्कोप कि बाते, आज के फनकार’ आदी कार्यक्रमांनी तमाम कानसेनांना झपाटले.


आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र सुरू होण्यापूर्वी रेडीओ सामान्यपणे क्रिकेटची कॉमेन्ट्री ऐकण्यासाठी दर्दी मंडळीच्या कानाजवळ दिसायचा. पण टीव्ही आला तशी या रेडीओची रवानगी कानापासून दूर टेबलवर किंवा एखाद्या खिडकित झाली. फारच लाईट गेली तरच कॉमेन्ट्रीसाठी पुन्हा रेडीओकडे वळायचे. पण आकाशवाणीचे यवतमाळ ‘एफएम’ सुरू झाले आणि भिंतीवरील एखाद्या खुंटीला खरखर करीत टांगलेल्या रेडीओची क्रेझ पुन्हा वाढली. तोपर्यंत गावातील नोकरदार मंडळी आणि बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या शेतकऱ्यांकडे टीव्ही पोचला होता. रामायण, महाभारत या किंवा अन्य पौराणिक मालिकांशिवाय बुधवारचा ‘चित्रहार’, गुरूवारचे ‘छायागीत’, रविवारच्या सकाळची ‘रंगोली’ आणि आठवड्यातील दोन सिनेमे असं एकंदरीत टीव्हीवरील मनोरंजनाचे पॅकेज होते. त्यात सिनेगीतांचे कार्यक्रम फार नव्हते़ त्यात लोडशेडिंगमुळे दुपारी टीव्ही बहुतांश काळ बंद. त्यामुळे अशावेळी रेडीओ हाच आपल्या हक्काचा वाटायचा.
पुढे काळ झपाट्याने बदलला. ‘कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ने अक्षरश: क्रांती घडविली. देशात एकिकडे खाजगी टीव्ही चॅनल्सने मनोरंजनापलिकडे जाऊन कधीकाळी रेडीओनेच आणलेली ‘इन्फोटेनमेंट’ची कन्सेप्ट रुंदावली. तर दुसरीकडे टेलीफोनला पर्याय म्हणून आलेल्या मोबाईल फोनने संवादक्रांतीची गुढी उभारली. तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण अत्यंत वेगात घडविणारे उपकरण म्हणजे मोबाईल फोन. अगदी गावखेड्यातील सामान्यांपर्यंत अल्पावधीतच पोहचलेले जगातील हे एकमेव तंत्रज्ञान असावे. संवाद आणि संपर्क साधण्यासाठी आलेल्या या मोबाईल फोनने संवादाव्यतिरिक्तही बरच काही आपल्यात सामावून घेतलं. सुरूवातीच्या हॅण्डसेटमध्ये गाणी नव्हती. त्यानंतर ‘मल्टीमीडिया’ हॅण्डसेटमध्ये मेमरीकार्डची सोय आली आणि सातशे आठशे गाणी सहज हॅण्डसेटमध्ये बसायला लागली. ‘वॉकमॅन’कडे एकेकाळी नवलाईने बघणाऱ्यांसाठी ही सोय म्हणजे पर्वणीच. मोबाईलमध्ये रेडीओही ‘वाजत’ असल्याने हे छोटं डबडं म्हणजे ‘अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता’.

मोबाईलमुळे वाटेल तेव्हा आपल्या आवडीची गाणी ऐकण्याचे स्वातंत्र्य सर्वांना मिळाले़ दरम्यान, चित्रपट संगीताला वाहिलेले अनेक चॅनल्स सुरू झालेत. ख़ेड्यापाड्यातही ‘केबल’ पोहोचला. तरीपण रेडिओ आणि ‘विविध भारती’वरील प्रेम कायम आहे. आज स्मार्ट फोनच्या युगातही ‘विविध भारती’चे सूर शहरासह गावात आणि शेतशिवारात घुमत आहेत.

‘शॉर्ट वेव्ह नौ हजार आठसौं सत्तर मेगाहर्टझ पर हम आपका स्वागत करते है’, अत्यंत शालीन, मधाळ आवाजातील हे वाक्य कानावर पडले कि देशभरातील लाखो रेडीओ सेट सुरू होतात. कार्यक्रमातील सर्वच गाणी आपल्या आवडीची नसणारच. बरं, नावडते गाणं आलं तर फॉरवर्ड करायची सोय नाही. एखादं गाणं आवडलं म्हणून पुन्हा ऐकण्याची पण सोय नाही. हे सारं स्वातंत्र्य मोबाईल फोन किंवा सीडी प्लेअरमध्ये. तेही सहज उपलब्ध. तरीही रेडीओ आज इतका लोकप्रिय का? रेडीओवर वाजणारी गाणी आपल्याही मोबाईल फोनमध्येही असतात, नाहीतर ‘गूगल’ आहेच. तरीही आपल्या आवडीचं गाणं रेडीओवर ऐकणे ‘अजी म्या ब्रह्म पाहिला’ असेच असते. असे का?

एकंदरीतच आपल्याला भविष्याची मोठी उत्सुकता. उद्याच्या आपल्या आयुष्याबद्दल आपण कायम उत्सुक असतो. कधी चिंतितही असतो. हातून निघून गेलेले क्षण भूतकाळात पुन्हा पुन्हा डोकाऊन शोधण्याची आपली सवय जशी आपले वर्तमान सुसह्य करते, त्याचप्रमाणे भविष्याविषयीची आपली उत्सुकता, अस्वस्थतासुद्धा आपल्या आजच्या जगण्यात मजा आणते. आपल्या आयुष्यात उद्या काय घडणार आहे, याचे उत्तर आजच मिळाले तर जगण्यातील सारी मजाच निघून जाईल. रेडीओ नेमका आपल्याला अशीच मजा देतो. ही मजा मोबाईल फोन आणि ईतर कुठे मिळणार? खरं सांगायचे तर, आपलं सारं सुख आपल्या हाती नसणे हीच सुखातली खरी मजा आहे. आयुष्याच्या एखाद्या क्षणी सुखाशी होणारी आपली भेट अपेक्षापूर्तीचा आनंद असतोे. आज वाट्याला दुख: आलेच तर उद्या कधीतरी पुन्हा सुख येईल ही आशा जगण्याचं बळ देत राहते. रेडीओ तरी गाणी ऐकविताना वेगळं काय करतो!

अतुल विडूळकर
8408858561

Atul Vidulkar

vidulkaratul@gmail.com

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!