चक्क हैदराबादहुन तो ‘मटका’ लावायला आला वणीत !

मटका लागलेले पैसे चालकाने हडप केल्याचा 'त्याचा' आरोप.... दया नायकचा मित्र असल्याचा मटका बहाद्दराचा दावा...

जितेंद्र कोठारी, वणी: एक इसम चक्क हैदराबादहून वणीला केवळ मटका लावण्यासाठी आला. त्याला मटका लागलाही. मात्र जिंकलेली रक्कम तर त्याला मिळालीच नाही उलट त्याने लावलेले 49 हजारांची रक्कमही मटका चालकाने हडपली, असा आरोप करत सध्या हा इसम पोलीस ठाण्यात ‘न्याय’ मागण्यासाठी धडकला. तर दुसरीकडे मात्र पोलीस दफ्तरी वणी शहरात मटकापट्टी व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या प्रकरणी त्याला कसा ‘न्याय’ द्यावा याबाबत पोलिसांची चांगलीच भांबेरी उडाली.

‘धंदा दो नंबर का करते है लेकीन इमानदारी से करते है’ असा संवाद तुम्ही एखाद्या डॉनच्या तोंडून हिंदी सिनेमात अनेकदा ऐकला असेलच. या पासून अनेक छोटे मोठे डॉन व अवैध व्यावसायिक ‘प्रेरणा?’ घेऊन आपला अवैध व्यवसायही प्रामाणिकपणे चालवतात. मात्र सध्या कलयुगात ‘इमानदारी’ नावाची गोष्ट उरली नाही. याचीच प्रचिती येणारी गमतीदार घटना घडली. बेईमानी करत पैसे हडप केले असा आरोप करत मटका बहाद्दर सध्या न्याय मागतोय.

सविस्तर वृत्त असे की सोमवारी दिनांक 13 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता एक इसम वणी पोलीस ठाण्यात पोहचला. वय अंदाजे 50 वर्ष, पेहराव अगदी ‘अप टू डेट’ व तोंडी अस्खलित इंग्लिश भाषा. बोलण्यावरून थोडी ‘इंग्लिश’ लावल्याचीही अनेकांना शंका होती. त्याने इंग्रजी भाषेत डायरी अमलदाराला सांगितले की तो हैद्राबादहुन मटका खेळायला वणीत आला मात्र त्याची फसवणूक झाली. त्यावर तिथले कर्मचारी चांगलेच अचंबित झाले. त्याला जे काही आहे ते हिंदी भाषेत सांगा म्हटल्यावर तो बोलू लागला.

त्या इसमाच्या म्हणण्यानुसार, तो कायमच वणीत मटका खेळण्यासाठी हैदराबादहून येतो. तो असाच मटका लावण्यासाठी वणीत आला होता. त्याने एका मटका चालकाच्या अकाउंटमध्ये 49 हजार रुपये मटका लावण्यासाठी टाकले. त्याला 52 हजारांचा मटका देखील लागला. त्यामुळे त्याला 1 लाख 1 हजार रुपये मटका चालकाकडून घेणे होते. पैसे घेण्यासाठी तो गेला असता तिथे मटका चालकाने बेईमानी करत पैसे देण्यास नकार दिला. उलट चार पाच लोकांनी त्याला धमकावले व जे करायचे ते कर, जिथे जायचे तिथे जा असे सांगून त्याला परत पाठवले. असे त्या मटका बहाद्दराचे म्हणणे आहे.

मटका लावण्यासाठी दिलेले पैसे तर गेलेच मात्र मटका लागल्यावर मिळणारे पैसे ही गेले. त्यामुळे हताष होऊन त्याने संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास वणी पोलीस स्टेशन गाठले. एक मटकाबहाद्दर चक्क पोलीस स्टेशन मध्ये न्याय मागण्यासाठी आल्याने पोलीस स्टेशनमध्ये काही काळ चांगलीच खळबळ उडाली.

तो इसम चकमक फेम दया नायकचा मित्र !
सदर इसमाने तो चकमक फेक दया नायक यांचा मित्र असल्याचा दावा केला. तसेच त्याने मटका लावण्याचा गुन्हा केला असून तो ‘डिफॉल्टर’ आहे. मात्र तरीही आपल्याला न्याय द्यावा असे आर्जव त्याने केले. मात्र सध्या वणी शहरात कुठेही मटका सुरू नाही. शिवाय आज साहेब नाहीत, त्यामुळे तुम्ही साहेब आल्यावर जी काही तक्रार आहे ती द्या असे सांगत त्याला परत पाठवले.

मटका व्यावसायिकांना रतन खत्रीच्या ‘आदर्शा’चा विसर !
कुख्यात मटका व्यावसायिक रतन खत्री याला भारतातील मटकापट्टीचा जनक मानले जाते. त्यानेच मुंबईहून मटकापट्टीला सुरुवात केली. हा अवैध व्यवसाय त्याने प्रचंड प्रामाणिकपणे केला. त्यामुळे लवकरच त्याच्या या अवैध व्यवसायाचा पसारा देशभरात पसरला. त्या पासून ‘प्रेरणा’ घेऊन जागोजागी स्थानिक रतन खत्री तयार झाले. आजही हा व्यवसाय ईमानदारीनेच चालत असल्याचे मटका शौकीन सांगतात. मात्र अवैध व्यावसायिकांना रतन खत्रीच्या आदर्शाचा विसर तर पडला नाही, अशी म्हणायची वेळ सध्या आली आहे.

शहरात ऑनलाईन मटका?
राज्यातीलच नव्हे तर मध्यप्रदेश, तेलंगणा व आंध्रप्रदेश येथील शौकीन मटका खेळण्यासाठी वणीत येतात तसेच मटकापट्टी व्यवसायात वणी हे एक मोठा केंद्रबिंदू असल्याचे बोलले जाते. मटका आणि क्रिकेट सट्टाच्या व्यवसायात दररोज करोडो रुपयांची विक्रमी उलाढाल वणीत होते. मागील काही दिवसांपासून पोलीस विभागाने सतत धाडसत्र अवलंबून अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. मात्र अद्यापही ऑनलाइन पद्धतीने मटका व्यवसाय लपून छपून सुरूच आहे. या अवैध धंद्यावर कधी ‘बाज’ येईल हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा: 

उद्या वणीतील कल्याण मंडपम येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

 

देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

पालकांचा कल आता जगप्रसिद्ध सिंगापूर पॅटर्नकडे

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

 

 

Comments are closed.