शिरपूरच्या सुमीत रामटेकेंची उंच भरारी, झाले आयपीएस अधिकारी

0
177

निकेश जिलठे, वणी: शिरपूर येथील रहिवाशी असलेले सुमीत रामटेके हे आयपीएस झाले आहे. आज यूपीएससीचा निकाल लागला. यात 358 रँक मिळवत सुमीतची आयपीएससाठी निवड झाली आहे. सुमीतचा हा 7 वा प्रयत्न होता. या आधी सुमीतची सशस्त्र पोलीस बळ विभागात असिस्टंट कमांडन्ट पदी निवड झाली होती. मात्र आयपीएस हेच ध्येय असल्याने सुमीतने नोकरीवर रुजू न होता पुढे प्रयत्न सुरू केले. 2019 साली सुमीतने यूपीएससी परीक्षेत 748 रँक मिळवत यश प्राप्त केले. त्यानंतर सुमीत हे केंद्र सरकारच्या कार्पोरेट कार्य मंत्रालयाअंतर्गत नवी दिल्लीतील इंडियन कॉर्पोरेट लॉ विभागात असी. डिरेक्टर या पदावर रुजू झाले. सध्या सुमीत याच विभागात कार्यरत आहेत. मात्र अखेर त्यांची यावेळी आयपीएससाठी महाराष्ट्र बॅचमधून निवड झाली आहे. सुमीत यांना आयएएस मिळत असताना देखील त्यांनी आयपीएसची निवड केली हे विशेष. सुमीतच्या या यशामुळे केवळ शिरपूरच नाही तर संपूर्ण तालुका हुरळून गेला आहे. निकाल लागताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुमीत हे सर्वसामान्य कुटुंबातील असून कठोर परिश्रमातून त्यांनी हे यश मिळवले आहे.

सुमीतचा प्रेरणादायी संघर्ष
सुमीत सुधाकर रामटेके हे एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहे. वडील सुधाकर रामटेके हे शिरपूर येथील गुरुदेव शाळेत परिचारक तर आई ज्योत्स्ना रामटेके या गृहिणी. सुमीतचे प्राथमिक शिक्षण शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. मात्र सुमीतमध्ये शिकण्याची जिद्द होती. शहरात शिक्षणाच्या अधिक संधी मिळते या कारणाने त्याने सातवीनंतर शिक्षणासाठी घर सोडण्याचा निश्चय केला व वणीतील जनता शाळेत प्रवेश घेतला. दहावीतही त्याचे यश दिसून आले. पुढील शिक्षणासाठी त्याने थेट नागपूर गाठले. नागपुरातील सोमलवार महाविद्यालयातून त्याने 12 वी केले.

दुसरीकडे घरची परिस्थिती बेताची होती. सुमीतच्या आईने पॉलिटेक्निक केले होते. त्यांना नोकरीही लागली. मात्र मुलं सुमीत आणि अमीत यांचे शिक्षण आणि सांभाळ योग्यरित्या व्हावा यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. एकीकडे मुलगा सुमीत शिक्षणासाठी परिश्रम घेत होता तर दुसरीकडे घरखर्च, मुलांच्या शिक्षण यात खंड पडू नये म्हणून वडिलांसोबत सुमीतची आईही कठोर परिश्रम घेत होती. त्याच्या आईने गावातच शिवणकला व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला.

कुटुंबीयांसोबत सुमीत

सुमीतने अचानक तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधले ते 12 वी मध्ये आयआयटी एन्ट्रन्स परीक्षेच्या निकालनंतर. त्यावेळी जिल्ह्यात केवळ दोन विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र ठरले होते. त्यातला एक म्हणजे सुमीत. एका गावातील मुलगा जिल्ह्यात टॉप करतोय हा सर्वांसाठीच सुखद धक्का होता. पुढे सुमीतने आयआयटी वाराणसी येथे बीटेक साठी प्रवेश घेतला. तिथून त्याने 2015 मध्ये डिग्री पूर्ण केली.

तसं डिग्री झाली की सर्वांना वेध लागते ते नोकरीचे. त्यातल्या त्यात आयआयटी पास झालेल्या मुलांना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच लाखों रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळते. मात्र सुमीतच्या मनात हा काहीतरी वेगळेच होते. त्याला केवळ पैसे कमवून देणारी नोकरी नाही तर समाज घडवणारी नोकरी करायची होती. ही सिस्टिम बदलवायची असेल तर आधी त्या सिस्टिमचा भाग होणे गरजेचे आहे अशी त्याची धारणा आहे. यासाठी त्याने इंजिनियरिंगच्या तिस-या वर्षीच प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले. त्यात त्याला  यश ही आले.

सुमीतला गृह विभागाच्या अखत्यारित येणा-या केंद्रिय सशस्त्र पोलीस बळ विभागात असिस्टंट कमांडन्ट पदी निवड झाली. मात्र सुमीतचे ध्येय हे आयपीएस असल्याने त्याने पुन्हा परीक्षा दिली. त्यात त्याला पुन्हा यश मिळाले. सुमीतने 748 वी रँक मिळवली. त्यानंतर सुमीत हे केंद्र सरकारच्या दिल्लीतील इंडियन कॉर्पोरेट लॉ विभागात असी. डिरेक्टर या पदावर रूजू झाले.

आयपीएस हे अधिक चॅलेन्जिंग – सुमीत रामटेके, आयपीएस
सरफरोश चित्रपटातील आमिर खानची एसीपी अजय कुमारची व्यक्तीरेखा आपल्या सर्वांना आठवत असेलच. यात एसीपी अजय कुमार आयएएस मिळत असतानाही आयपीएस घेतो. असेच काहीसे ध्येय हे सुमीतचे होते. पोलीस विभागाचा सर्वाधिक प्रभाव हा समाजात असतो. शिवाय हा एक चॅलेन्जिंग जॉब आहे. सर्वसामान्य, तळागाळातील लोकांना अद्यापही न्याय मिळत नाही. त्यासाठी आयपीएस हा सर्वात चांगला पर्याय वाटतो. त्यामुळे आयएएस सहज मिळणे शक्य असतानाही आयपीएस घेण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया सुमीत रामटेके यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

परिसरातील व ग्रामीण भागातील मुलांना करणार मदत
परिसरात अनेक विद्यार्थ्यांकडे क्षमता आहे. मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने आपल्याकडील मुलांना योग्य ती संधी मिळत नाही. गाव खेड्यातील मुलगा शिकला पाहिजे. मोठा झाला पाहिजे यासाठी जी काही मदत लागेल ती मदत आणि मार्गदर्शन करण्यास मी कुठेही कमी पडणार नाही. वाचण, अभ्यास या गोष्टी व्यक्तीला घडवतात. त्यामुळे यावर्षी वणीमध्ये आणि त्यापुढे शिरपूर येथे अभ्यासिका आणि वाचनालय सुरू करण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रियाही सुमीतने ‘वणी बहुगुणी’ला दिली.

सुमीतच्या यशाने सर्व गाव आणि परिसर हुरळून गेला आहे. त्याच्यावर सर्वीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुमीत या यशाचे सर्व श्रेय आई वडिलांना देतो. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्याच्या पालकांनी त्याला घडवलं. आईच्या त्यागाला तो सर्वाधिक महत्त्व देतो. बाहेर शिकताना नागपूरला असलेली त्याची ताई उज्ज्वला लोखंडे आणि भावजी मिलिंद लोखंडे यांनी त्याला सांभाळले. न्यू व्हिजन आयएएस अकादमी नागपूर व तिथले शिक्षक विजय ढोके यांना ही तो या यशाचे श्रेय देतो. यासह तो मित्रांचे आभार मानतो. यूपीएससीच्या तयारीत मोठा कालखंड गेला. या काळात मानसिक स्वास्थ सांभाळणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी गावातील मित्र तसेच कॉलेज व सर्कलमधल्या मित्रांनी वेळोवेळी मानसिक बळ दिले. अशा मित्रांचाही यशात मोठा वाटा असल्याचे सुमीत सांगतो. 

हे देखील वाचा:

वणीच्या डॉ. आकांक्षा तामगाडगे यांची UPSC परीक्षेत 562 वी रँक

Previous articleबोअरचे पाईप नेणाऱ्या गाडीचा अपघात, एक जण जागीच ठार
Next articleवणीच्या डॉ. आकांक्षा तामगाडगे यांची UPSC परीक्षेत 562 वी रँक
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...