खळबळजनक : मोहदा (वेळाबाई) चे उपसरपंच व ग्रा.प.सदस्य अपात्र घोषित

ग्रा.प. सदस्यांनी स्वतः तर उपसरपंचाच्या आईने शासकीय जागेवर अतिक्रमणची केल्याची तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील महत्वाच्या मोहदा (वेळाबाई) ग्रामपंचायतीचे उपसरपंच व एका ग्रामपंचायत सदस्याला अपात्र घोषित करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उपसरपंच सचिन ज्ञानेश्वर रासेकर व ग्रामपंचायत सदस्य गजानन विलास शेलवडे असे अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांचे नाव आहे. ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1)(ज)(3) मधील तरतुदीनुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.

अर्जदार गौतम अमरसिंग सुराणा रा. मोहदा यांनी 1 मार्च 2021 रोजी अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे न्यायालयात गैरअर्जदार ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच सचिन ज्ञानेश्वर रासेकर विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. उपसरपंच सचिन रासेकर यांची आई रंजना ज्ञानेश्वर रासेकर हिने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. सचिन रासेकर यांचे एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे ग्रा.प. अधिनियम 1958 चे कलम 14 (1)(ज)(3) मधील तरतुदीनुसार सचिन ज्ञानेश्वर रासेकर यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व आणि उपसरपंच पद रद्द करण्याची मागणी अर्जदार गौतम सुराणा यांनी केली होती.

अर्जदार हरिदास गणपत केलझरकर रा. मोहदा यांनी दि. 21 जून 2021 रोजी मोहदा ग्रामपंचायत सदस्य गजानन विलास शेलवडे यांनी जि.प.उ.प्रा. शाळा मोहदा यांची मालकीच्या 10×10 फूट जागेवर अतिक्रमण करून शेड उभारल्याची तक्रार जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली होती. या दोन्ही अर्जावर अर्जदार व उत्तरवादीच्या अधिवक्त्यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद, सचिव ग्रा.प. मोहदा व मुख्याध्यापक जि. प. उच्च प्रा. शाळा मोहदा यांनी दिलेले अहवाल व इतर दस्तावेज यांचे अवलोकन करून अपर जिल्हाधिकारी प्र.कि.दुबे यांनी यानी 8 जून 2022 रोजी पुढील आदेशा पर्यंत मोहदा ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन रासेकर व ग्रा प. सदस्य गजानन शेलवडे या दोघांना अपात्र घोषित केले.

सरपंच, सदस्य पद अपात्र कधी होते ?
ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्यापूर्वी किंवा निर्वाचित (निवडून आलेले ) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असेलेले सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य अथवा त्यांचे कुटुंबीयांनी शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले असल्यास अशा व्यक्तीस ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1)(ज)(3)नुसार अपात्र ठरविण्यात येते.

मोहदा येथे मोठ्या प्रमाणात दगड खाणी व क्रॅशर प्लांट आहे. या उद्योगातून मोहदा ग्रामपंचायतीला दरवर्षी लाखो रुपये महसूल मिळत असते. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये सत्तारूढ पक्षाला सर्व 9 सीट गमवावी लागली. त्यानंतर गावातील दोन्ही गटांनी एकमेकांची तक्रार करण्याचा सपाटा लावला आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.