तब्बल दोन लाखात पडले टरबूज… भामट्यांनी साधला डाव

शेतीसाठी काढलेले पैसे नगरपालिकेजवळून लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शेती विकत घेतल्याने त्याचे बाकी असलेले पैसे देण्यासाठी दोन लाख रुपये बँकेतून काढले. उन्हाळा असल्याने त्यांनी मध्येच टरबूज खरेदी करण्यासाठी गाडी थांबवली व टरबूज विकत घेतले. मात्र दरम्यान भामट्यांनी डाव साधत त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ठेवलेले 2 लाख रुपये लंपास केले. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता दरम्यान नगरपालिकेसमोर ही घटना घडली. दरम्यान दुचाकीजवळ उभी असलेली एक महिला व अल्पवयीन मुलींनी रक्कम चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार आनंदराव गंगाराम कोकमवार (64) रा. जैन ले आऊट वणी हे वेकोलि येथील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात सेवानिवृत्तीतून आलेल्या पैशातून मांगली येथे 5 एकर शेती खरेदी केली होती. त्याचे 5 लाख रुपये त्यांना देणे बाकी होते. आज दिनांक 5 एप्रिल रोजी आनंदराव हे त्यांच्या मुलासह 2 लाख रुपये काढण्यासाठी स्टेट बँकेत त्यांच्या शाईन या दुचाकीने गेले होते. तिथून त्यांनी 2 लाख रुपये काढले. काढलेले पैसे व बँकेचे पासबुक त्यांनी पिशवीमध्ये टाकले व पिशवी मोटरसायकलच्या पेट्रोल टॅंकवरील बॅगमध्ये ठेवून ते घराकडे निघाले.

घरी भाजीमंडीच्या मार्गाने जात असताना त्यांनी टरबूज घेण्यासाठी दुचाकी थांबविली. नगर परिषदच्या लोखंडी गेट समोर दुचाकी ठेवून कोकमवार हे टरबूज घेण्यासाठी फळविक्रेत्याकडे गेले. टरबूज घेऊन परत दुचाकीजवळ आले असता त्यांना पेट्रोल टँक कव्हरची चेन उघडी दिसली. कोकमवार यांना संशय आल्यामुळे त्यांनी बॅगची तपासणी केली असता पैशाने भरलेली पिशवी गायब होती. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी इकडे तिकडे शोध घेतला मात्र जवळपास कोणीही संशयास्पदरित्या आढळून आले नाही.

पैसे चोरीला गेल्याचे कळताच कोकमवार यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठून दुचाकी मधून दोन लाख रुपये लंपास झाल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी लगेच आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही तपासणी केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादंविच्या कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय प्रवीण हिरे करीत आहे.

स्टेट बँकेपासूनच सावजाचा पाठलाग?
पैसे चोरीला गेल्यानंतर त्यांनी विचारपूस केली. घटनास्थळी त्यावेळी मोटरसायकलजवळ एक महिला व अंदाजे 7 वर्षाची मुलगी तसेच काही अंतरावर एक दुचाकीस्वारही उभा असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी त्यांना सांगितले. याआधीही बँकेतून पैसे काढल्यानंतर काही भामट्यांनी डिक्कीतून पैसे काढल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा स्टेट बँकेपासूनच पाठलाग सुरू होता व संधी मिळताच भामट्यांनी पैसे चोरल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. दरम्यान या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.