सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेजापूर ते चिलई मार्गाने चोरीची रेती भरून येणारे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री तेजापूर व चिलई मार्गाने अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान अडेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना तेजापूर ते चिलई मार्गावरील पोलीस पाटील महादेव बोबडे यांच्या शेताजवळून एक ट्रॅक्टर (MH29 AK 6758) येताना आढळला. या ट्रॅक्टरमध्ये 1 ब्रास रेती होती.
पोलिसांनी ट्र्र्रॅक्टर चालकाला रॉयल्टीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच रॉयल्टी आढळून आली नाही. त्यामुळे सदर रेती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त करून चालक शेषराव पुरुषोत्तम तलांडे (24) रा. धूनकी ता. वणी व मालक गणेश सूर्यभान चायकाटे (35) रा. धूनकी यांच्यावर कलम 379, 34 नुसार गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलिसांनी 1 ब्रास रेती ज्याची किंमत 6 हजार रुपये व ट्रॅक्टर किंमत 4 लाख रुपये असा एकून 4 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनात मोहन कुडमेथे, प्रवीण तालकोकुलवार, जितेश पानघाटे, रंजना सोयाम, नीरज पातूरकर, प्रदीप कवरासे, संदीप बोरकर व पुरुषोत्तम घोडाम यांनी केली. दरम्यान तालुक्यात इतर ठिकाणी चालणा-या रेती तस्करांवरही पोलिसांनी कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.