गम्मत केल्याने झाला वाद, एकाला फावड्याने मारहाण

मिस्त्री काम करीत असताना गम्मत करणे भोवले

बहुगुणी डेस्क, वणी: काम करीत असताना गम्मत केली म्हणून एका जणाला फावड्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तो जखमी झाला. तालुक्यातील उमरी येथे ही घटना घडली. प्रभाकर शंकर कनाके असे जखमीचे नाव आहे. तर गणेश सुरेश गेडाम असे मारहाण करणा-या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी दिनांक 14 जानेवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

फिर्यादी प्रभाकर शँकर कनाके (43) हा उमरी ता. वणी येथील रहिवासी असून तो मजुरी करतो. गावातच गणेश सुरेश गेडाम (28) हा राहतो. या दोघांमध्ये एक महिन्यांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. मंगळवारी दिनांक 14 जानेवारी रोजी प्रभाकर हा रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास त्याचा चुलत भाऊ रोहितची वाट पाहत होता. दरम्यान घरासमोर त्याचा मित्र गंगाधर काशिनाथ तिराणकर व गणेश सुरेश गेडाम हे काम करीत होते.

तेव्हा प्रभाकर याने त्याचा मित्र गंगाधर याच्याशी तुझ्या कामाचा वेळ झाला नाही का, तुला का पैशाची कमी आहे का, असे म्हणत गम्मत केली. तेव्हा गणेश रागाने हाती काम करीत असलेले फावडे घेऊन प्रभाकर जवळ आला. त्याने प्रभाकरशी कुणाशी गम्मत करतोय अशी विचारणा करीत प्रभाकरशी वाद घातला. त्याने रागाच्या भरात हातातील फावडा प्रभाकरच्या डोक्यावर मारला. यात प्रभाकरचे डोके फुटले. तसेच त्याने प्रभाकर याला आज वाचला पण उद्या काही बोलला तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.

दरम्यान प्रभाकरचा चुलत भाऊ रोहित कनाके हा मध्ये आला. त्याने वाद सोडवला व प्रभाकरला वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. प्राथमिक उपचार घेऊन प्रभाकरने रोहितला सोबत घेत वणी पोलीस स्टेशन गाठले व आरोपी गणेशविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गणेश सुरेश गेडाम विरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.