बहुगुणी डेस्क, वणी: तुमच्या संस्थेचे सौरउर्जा पम्पचे सबसिडीचे पैसे जमा झाले असल्याची बतावणी करून एका संस्थेच्या संचालकाची 4 लाख 80 हजारांनी फसवणूक केली. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या दरम्यानचे हे प्रकरण आहे. पवन उर्फ कार्तिक गौरकार रा. यवतमाळ असे या ठगाचे नाव आहे. सबसिडीचा चेक आल्याचे कारण सांगून त्यावरील जीएसटी भरा व चेक घ्या, अशी बतावणी करून आरोपीने वेळोवेळी संस्थाचालकाला गंडा घातला. या आरोपीने परिसरात आणखी एकाला अशाच प्रकारे गंडा घातल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
तक्रारीनुसार, मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ शिवारात वर्धा नदीच्या तिरावर श्री समर्थ सदगुरू ब्रह्मचारी महाराज हे संस्थान आहे. सदर संस्थानाच्या मालकीची शेजारीच चार एकर शेती आहे. या शेतात शासनाकडून मिळालेल्या सबसिडीवर बोअर मारला आहे. सदर बोअरवेलवर सोलर मोटार पम्प लावलेला आहे. 2023 मध्ये या सौरउर्जा पॅनलची मुदत संपली. त्यामुळे नोव्हेंबर 2023 रोजी संस्थाचालकाने कार्तिक गौरकार या इसमाला पॅनल बसवण्या संबंधी कॉल केला. दुस-या दिवशी या इसमाने संस्थेच्या संचालकाला मार्डी येथे भेटण्यास बोलावले.
दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी संस्थाचालक कार्तिक नामक इसमाला भेटण्यास मार्डी येथे गेले. तिथे कार्तिक याने तो मेडासोलर या कंपनीकडून आलो असल्याचे सांगितले. त्याने एक यादी दाखवत तुमच्या संस्थेला सोलर पॅनलची 1 लाख 3 हजारांची सबसिडी आली आहे. मात्र 18,590 रुपये जीएसटी भरल्यानंतरही तुम्हाला ही सबसिडी मिळणार असे सांगितले. तसेच पैसे पाठवण्यासाठी गुगल पे नंबर व वणी येथील एका खासगी बँकेचा अकाउंट नंबर दिला. संस्थाचालकाने मोबाईलवरून दिलेल्या खात्यात 18,590 रुपये मारले.
दुस-या दिवशी कार्तिक याने पुन्हा 27380 रुपये मोबाईलवर मारण्यासाठी सांगितले. संस्थाचालकाने ही रक्कम देखील ऑनलाईन मारली. त्यानंतर कार्तिक याने तुमच्या नावे सबसिडीचे आणखी तीन चेक असल्याचे कारण देत वारंवार रक्कम उकळत होता. 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या एक महिन्याच्या काळात संस्थाचालकाने 4 लाख 80 हजार रुपये कार्तिक याच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. दरम्यान कार्तिक नामक इसमाचा नंबर बंद येत असल्याने संस्थाचालकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी अधिक माहिती काढली असता त्यांना पांढरकवडा तालुक्यात देखील अशाच प्रकारे एकाची फसवणूक झाल्याचे कळले.
संस्थाचालकांनी अधिक माहिती काढली असता त्यांना फसवणूक करणा-या इसमाचे नाव हे पवन प्रमोद गौरकार रा. वडगाव रोड यवतमाळ असे असल्याचे कळले. अखेर संस्थेचे संचालक नरेश जुमडे यांनी 14 जानेवारी रोजी मारेगाव पोलीस ठाणे गाठत आरोपी पवन उर्फ कार्तिक गौरकार याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी यवतमाळ येथे जात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी पवनला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
Comments are closed.