बहुगुणी डेस्क, वणी: एका पानटपरी चालकाच्या दुकानात घुसून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. शनिवारी दिनांक 17 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास एकता नगर जवळ ही घटना घडली. या मारहाणीमुळे पान टपरी चालक साजीद रफिक शेख (36) हा चांगलाच दहशतीत आला आहे. जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वणीत कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सातत्याने होणा-या भाईगिरीच्या घटनेमुळे वणीची बीडच्या दिशेने तर वाटचाल सुरु झालेली नाही, अशी चर्चा सध्या रंगत आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी साजीद रफिक शेख (36) हा काजीपुरा वणी येथील रहिवासी असून त्याचा एकता नगर समोरील वरोरा रोडवर माजीद पान कॉर्नर नावाने पानटपरी आहे. शनिवारी संध्याकाळी साजीद हा नेहमीप्रमाणे पानटपरीवर गि-हाईक करीत होता. दरम्यान 5 वाजताच्या सुमारास तिथे शब्बीर खान (50), साकीब शब्बीर खान (19) सद्दू शब्बीर शेख (22) हे आले. त्यांनी जुना वाद उकरून काढला.
दरम्यान पानटपरीच्या आत यातील एक तरुण गेला व त्याने साजीदला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दोघे बाहेरून मारहाण करीत होते. नंतर बाहेरील दोघे जण आत गेले व त्यांनी साजीदला शिविगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी आमच्या गँगचे लोक तुला सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान सोमवारी या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा थरारक व्हिडीओ पाहून वणीत कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. साजीदने पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात राजरोसपणे अशी बेदम मारहाण झालेली असतानाही अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे वणीचा बीड तर होत नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Comments are closed.