आई व मामासमोरच मुलीला घेऊन मुलगा पसार, अंगावर घातली कार

शाळेला सुटी लागल्याने घरी आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले....

बहुगुणी डेस्क, वणी: एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. दरम्यान मुलीला शोधण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आई व मामाच्या अंगावर मुलाने कार नेण्याचा देखील प्रयत्न केला. मंगळवारी दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी वणी शहरात ही घटना घडली. आई व मामासमोरच मुलीला पळवून नेल्याने याबाबत तक्रार करण्यात आली. या प्रकरणी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

फिर्यादी ही वणीतील एका वार्डात राहत असून ती तिच्या पती व मुलींसह राहते. तिची मुलगी ही 14 वर्ष 3 महिन्यांची असून ती गेल्या काही काळापासून नागपूर येथे तिच्या आजीकडे (फिर्यादीच्या आईकडे) शिक्षणाच्या निमित्ताने राहते. सध्या शाळेला सुटी असल्याने ती वणी येथे आली होती. मुलीची आई ही काही कामानिमित्त नागपूर येथे तिच्या आईकडे गेली होती. मंगळवारी दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी ती घरी परत आली. तेव्हा तिला तीची मुलगी घरी दिसली नाही.

त्यामुळे तिने मुलीच्या मोबाईल नंबरवर कॉल केला. मात्र तिचा नंबर स्विच्ड ऑफ दाखवत होता. त्यामुळे मुलीच्या आईने मुलीच्या मैत्रिणीकडे, नातेवाईकांकडे, वार्डात विचारपूस केली. मात्र तिचा काही शोध लागला नाही. दरम्यान फिर्यादी महिलेच्या भावाला पिंटू नामक (नाव बदललेले) एका तरुणाचा कॉल आला. त्याने सांगितले की ती एका मुलासोबत असून तो देखील त्यांच्या सोबत असल्याची माहिती त्याने मुलीच्या मामाला दिली. सोबतच त्याने मुली व मुलाचे वणीतील लोकेशन देखील त्यांना पाठवले. 

अंगावर घातली गाडी
मुलीची माहिती मिळताच तिची आई व मामा हे वणीतील नांदेपेरा रोडवर गेले. तिथे त्यांना त्यांची मुलगी, मुलगा व पिंटू असे तिघे जण कारमध्ये बसलेले दिसले. त्यांनी कारच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीची आई व मामा कारच्या दिशेने येताना दिसताच आरोपीने त्यांच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केला. यातून ते थोडक्यात बचावले. थोड्या अंतरावर जाऊन कार थांबली. त्यानंतर कारमधून कपल उतरले. मुलगा मुलीला घेऊन पसार झाला. तर कारमध्ये केवळ पिंटू होता.

मुलीच्या आई व मामाने मुलगा, मुलगी कुठे गेले याबाबत पिंटूला विचारणा केली. यावर त्याने ते मला माहिती नाही, असे उत्तर दिले. मुलीला फूस लावून पळवून नेल्याने मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी मुलाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.