बहुगुणी डेस्क, वणी: वणी बस स्थानकावरून एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची तुळशीमाळ चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवार, दिनांक 2 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बस स्थानक हा चोरट्यांचा अड्डा बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक चोरीच्या घटना येथे घडल्या. त्यामुळे बस स्थानकावर गर्दीच्या वेळी प्रवाशांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
तक्रारीनुसार, रविंद्र वसंतजीभाई कारिया (66) हे गंजवाड वार्ड, चंद्रपूर येथील रहिवासी आहे. त्यांची कळंब येथे शेती आहे. त्यामुळे ते शेती पाहण्यासाठी चंद्रपूर ते कळंब असा प्रवास करतात. मंगळवारी ते कळंबवरून थेट चंद्रपूरला बस कमी असल्याने ते वणी येथे आले होते. वणी बस स्थानकावरून ते चंद्रपूरला जाण्यासाठी बसमध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे 15 ग्रॅम वजनाची 60,000 रुपये किंमतीची सोन्याची तुळशीमाळ चोरली.
कारिया यांनी तात्काळ शोधाशोध केली, परंतु माळ सापडली नाही. त्यानंतर त्यांनी वणी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वणी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
Comments are closed.