श्री विठ्ठल रुक्मिणी हेमाडपंथी देवस्थान सभा मंडपाचे भूमिपूजन

आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील आंबेडकर चौकातील श्री विठ्ठल रुक्मिणी हेमाडपंथी देवस्थानात रविवार, दिनांक 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला वणीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली, आणि मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी उसळली होती.

नवशक्ती दुर्गा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जय जगन्नाथ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, वणी यांचे अध्यक्ष संजय खाडे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, मयूर जोशी महाराज, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मंदिराचे ट्रस्ट सचिव प्रमोद लोणारे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष दौलत वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या भव्य सभा मंडपाचे बांधकाम पुढील आषाढी एकादशीपर्यंत (2026) पूर्ण करण्याचा आणि भक्तांसाठी लोकार्पण करण्याचा मानस रवी बेलुरकर यांनी व्यक्त केला.

हा सभा मंडप मंदिरातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भक्तांना अधिक सुविधा देण्यासाठी बांधला जाणार असून, यामुळे मोठ्या संख्येने भाविकांना एकाच वेळी दर्शन आणि सहभागाची संधी मिळेल. असे मनोगत बेलुरकर यानी व्यक्त केले. नवीन सभा मंडपाच्या निर्मितीमुळे मंदिराची क्षमता आणि सुविधा वाढतील, ज्यामुळे भक्तांना अधिक चांगला अनुभव मिळेल. असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता भाविकांसाठी उसळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये वार्डातील महिला, पुरुष आणि बालकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या भूमिपूजन सोहळ्यासाठी आंबेडकर चौक परिसरातील नागरिकांनी आणि नवशक्ती दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. श्री विठ्ठल रुक्मिणी हेमाडपंथी देवस्थान हे वणीतील वारकरी संप्रदायाचे प्रमुख केंद्र आहे. हे मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक भक्तांचे श्रद्धास्थान आहे आणि आषाढी एकादशीसारख्या उत्सवांदरम्यान येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.