बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर सतत अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पीडित मुलीला सात महिन्यांची गर्भधारणा झाल्याचे तपासणीत उघड झाले. आरोपीवर पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही अनुसूचित जमातीतील असून, वणी तालुक्यातील एका गावाची रहिवासी आहे. बादल अनंता बेलेकार (वय १८, रा. साखरा, ता. वणी) या तरुणाने तिच्याशी ओळख वाढवत प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर शहरातील एका मंदिरात तिच्या गळ्यात हार टाकून त्याने तथाकथित लग्न केले. डिसेंबर २०२४ पासून त्याने तिच्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार केले, ज्यामुळे मुलीला गर्भधारणा झाली.
मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्याने ती गावातील आरोग्य सेविकेकडे तपासणीसाठी गेली. तपासणीत तिच्या पोटात सात महिन्यांचा गर्भ असल्याचे उघड झाले. ही बाब आरोग्य सेविकेने पोलिसांना कळवली. पोलिसांनी पीडितेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, बादल बेलेकारने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बीएनएसच्या कलम ६४(२)(M), अॅट्रॉसिटी कायद्याच्या सहकलम ३(१)(w)(i), ३(२)(v), ३(अ), ४ आणि पोक्सो कायद्याच्या सहकलम ५(i)(ii), ५(L), ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी बादल बेलेकार याला केळापूर सेशन कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Comments are closed.