कळमणा येथील कोल वॉशरी कामगारांचे आमरण उपोषण
कामगार नेते व काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांची उपोषणाला भेट
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी तालुक्यातील कळमना (खु) येथील कार्तिकेय कोल वॉशरीज प्रा. लिमिटेड या कंपनीतील कामगार बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. कामगारांना अद्यापही 18 दिवसांचे काम व वेतन मिळत नाही. यासह विविध मागण्यासाठी कामगारांनी कंपनी विरोधात आंदोलन सुरु आहे. उपोषणाच्या दुस-या दिवशी कामगार नेते व काँग्रेसचे राज्य सचिव संजय खाडे यांनी सहका-यांसह उपोषण मंडपाला भेट देत कामगारांशी चर्चा केली व त्यांनी कामगारांच्या लढ्याला पाठिंबा दिला.
या आहेत कामगारांच्या मागण्या
कामगारांच्या न्यायिक मागण्यांमध्ये त्यांना कंपनीमध्ये किमान १८ दिवसांचे वेतन व काम देण्यात यावे. कंपनीमध्ये कामगारांची थकीत असलेली रक्कम तथा वन टाईम सेटलमेंटची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक कामगारांना १० लाख रुपये देण्यात यावे. कंपनी तात्पुरत्या स्वरूपात बंद होत असेल तर कंपनी सुरु झाल्यावर त्याच कामगारांना कंपनीमध्ये सामावून घेण्यात यावे इत्यादा मागण्यांचा समावेश आहे.
कामगारांना न्याय मिळायलाच हवा – संजय खाडे
कामगार हा कंपनीचा कणा आहे. त्यांच्या मेहनतीवर आणि समर्पणावर कंपनीचे यश अवलंबून असते. कामगारांच्या श्रमातूनच उत्पादन, प्रगती आणि समृद्धी निर्माण होते. त्यांचे हक्क, वेतन, आणि सन्मान यांची जपवणूक करणे हे प्रत्येक कंपनीचे कर्तव्य आहे. कामगारांच्या मागण्या या केवळ मागण्या नसून त्यांच्या मेहनतीचा आणि हक्कांचा आदर आहे. कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळाले तरच कंपनी आणि समाज दोन्ही बळकट होऊ शकतात. – संजय खाडे
शनिवारी कामगारांचे आंदोलन सुरूच होते. शुक्रवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी आमदार संजय देरकर यांनी देखील उपोषण मंडपाला भेट देत कामगारांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. दरम्यान अद्याप कंपनीने आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याची माहिती आहे. संजय खाडे यांच्यासोबत प्रमोद वासेकर, तेजराज बोढे यांच्यासह खाडे यांचे सहकारी उपस्थित होते.



Comments are closed.