नोकरीत स्थानिकांना डावलून परप्रांतियांना संधी – भूमिपुत्रांचा संताप
उकणी परिसरातील बेरोजगार तरुणांचा आक्रोश, 7 तारखेला चक्काजाम
बहुगुणी डेस्क, वणी: उकणी कोळसा खाण प्रकल्पग्रस्त गावांतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा संताप अखेर उफाळून आला आहे. स्थानिकांना रोजगारात सामावून घेण्यात कंपनीकडून सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. याविरोधात स्थानिकांनी थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारत कंपनी विरोधात एल्गार पुकारला आहे. भूमीपुत्रांना नोकरीत सामावून न घेतल्यास दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी उकणी बसस्थानकाजवळ चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव व कामगार नेते संजय खाडे यांनी दिला आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाला इशारा पत्र देण्यात आले आहे.

उकणी कोळसा खान अधिनस्त नारायणी अँड सन्स कंपनी प्रा. लि. काम करते. उकणी गावातील तब्बल 90 टक्के जमीन प्रकल्पात गेली आहे. शेती नसल्याने गावात रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी भूमिपुत्रांऐवजी परप्रांतियांना नोकरीत सामावून घेत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराविना राहावे लागत आहे. उकणी व परिसरातील जुनाड, पिंपळगाव, लाठी, बेसा, निवली, बोरगाव, अहेरी, भालर या गावातील सुशिक्षित बेरोजगार, आय.टी.आय. धारक, चालक, हेल्पर तसेच कुशल-अकुशल कामगारांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. याबाबत वर्षभरापासून कंपनीला सातत्याने निवेदन देण्यात आले. मात्र कंपनीने दुर्लक्ष केल्याने अखेर आंदोलनाचा पर्याय भूमिपुत्रांनी स्वीकारला आहे.
कंपनीचा भूमिपुत्रांवर अन्याय
वेकोलिसाठी स्थानिकांनी आपली जमीन दिली. शेती गेल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि अनेक भूमिपुत्रांचा रोजगार संपला. प्रदूषणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून स्थानिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. वेकोलिच्या प्रगतीत भूमिपुत्रांच्या त्यागाचा मोठा वाटा आहे. मात्र वेकोलिसाठी काम करणा-या कंपन्या आता भूमिपुत्रांच्याच हक्कावर गदा आणत आहेत. हा अन्याय सहन केला जाणार नाही. हा कंपनीला दिलेला अखेरचा अल्टिमेटम आहे. – संजय खाडे, प्रदेश सचिव काँग्रेस, कामगार नेते
निवेदनावर मनोज खाडे, कान्हू लोनगाडगे, प्रभाकर खोब्रागडे, दिलीप ढवळे, मंगेश जुनगरी, सुरेश ढपकस, विशाल निब्रड, शुभम चिंचोळकर, साहिल जोगी, नरेंद्र खाडे, विजय कालेकर, मोहन पारशिवे, विनायक येसेकर, अक्षय ढपकस, यश शिवरकर, अरुण येमुर्ले, दादा खेडेकर, प्रशांत पाटील, कोमल सातपुते, सतोष दुधलकर, रामकिसन पारशिवे, योगेश कामतवार, किसन खेडेकर, प्रकाश मुंजेकर, रवि शिवरकर, अरुण डाहुले, सुनील गोवारदिपे आदींसह जुनाड, पिंपळगाव, लाठी, बेसा, निवली, बोरगाव, अहेरी, भालर गावातील रहिवाशांची स्वाक्षरी आहे.



Comments are closed.