24 तासांत कचरा उचला, अन्यथा वेकोलि कार्यालयासमोर आंदोलन

फैजल खान यांचा इशारा, राजूरमध्ये कचऱ्याचे ढीग, नागरिकांचा संताप

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील राजूर गावातील कचरा व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते फैजल बशीर खान व सय्यद मोसिम यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी वेकोली राजूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांना निवेदन सादर केले. गावातील साचलेला कचरा 24 तासांच्या आत हटवावा, अन्यथा वेकोली कार्यालयासमोर आंदोलन करून कचरा टाकण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राजूर गावातील अनेक भागांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. काही कचरा संकलन केंद्रांवरील कचरा तब्बल तीन महिन्यांपासून उचलला गेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या संबंधित यंत्रणा व ठेकेदारांकडून प्रभावीपणे काम होत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याने वेकोली प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी वेकोली प्रशासनाला 24 तासांचा अल्टिमेटम दिला असून, या कालावधीत गावातील सर्व साचलेला कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. अन्यथा वेकोली कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच, गावातील साचलेला कचरा कार्यालयासमोर टाकून प्रतीकात्मक निषेध नोंदविण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनाची वेळ आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वेकोली प्रशासन व संबंधित ठेकेदाराची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी दानिश काझी, आमीन शेख, वेदांत हिकरे, प्रियांशू आत्राम आणि अजय आडकिलवार उपस्थित होते.

Comments are closed.