सुकणेगावचा पठ्ठ्याची हिमालयाच्या हिमशिखरांकडे साहसी झेप !
कृष्णा डबरेची मनाली येथील प्रतिष्ठित गिर्यारोहण संस्थेच्या शिबिरासाठी निवड
बहुगुणी डेस्क, वणी : स्वप्न मोठे असेल तर मेहनतीची तयारीही तितकीच मोठी असावी लागते. रोज पहाटे दोन तासांचा फिटनेस सराव, अंगात प्रचंड जिद्द आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती… याच बळावर सुकणेगावच्या एका तरुणाने साहसाच्या नव्या क्षितिजाला गवसणी घातली आहे. शेकडो विद्यार्थ्यांमधून झालेल्या कठीण निवड प्रक्रियेत बाजी मारत कृष्णा जयप्रकाश डबरे याने थेट मनालीच्या हिमशिखरांकडे आणि कुल्लूच्या वेगवान जलप्रवाहांकडे झेप घेतली आहे. त्याची देशातील नामांकित मनाली गिर्यारोहण संस्था आणि कुल्लू येथील रिव्हर राफ्टिंग सेंटरच्या साहसी प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. अमरावती विद्यापीठातून अवघ्या 4 विद्यार्थ्यांची निवड झालेल्या या प्रतिष्ठेच्या साहसी शिबिरात कृष्णाने मिळवलेले स्थान वणी परिसरासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.
सुकणेगाव येथील रहिवासी असलेला कृष्णा सध्या लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच पोलीस भरतीची तयारीही तो वणीत राहून करतो. राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) स्वयंसेवक असलेल्या कृष्णाला खेळाची विशेष आवड आहे. तो उत्तम कबड्डीपटू असून विद्यापीठ स्तरावर त्याने आपल्या महाविद्यालयासह जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. खेळातील सहभाग आणि नियमित फिटनेस सराव यामुळे त्याची शारीरिक क्षमता अधिक विकसित झाली आहे.
काही दिवसांपूर्वी अचानक माउंटेनियरिंग शिबिरासाठी निवड चाचणी होणार असल्याची माहिती मिळाली. आधी यवतमाळ येथे जिल्हास्तरीय आणि पुढे अमरावती विद्यापीठ स्तरावर निवड चाचणी पार पडली. शेकडो विद्यार्थ्यांमधून आपल्या शारीरिक क्षमता, फिटनेस आणि जिद्दीच्या जोरावर कृष्णाने या चाचणीत यश मिळवले. त्याची मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स आणि कुल्लू येथील स्पोर्ट्स रिव्हर राफ्टिंग सेंटरच्या साहसी प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. 17 ते 26 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या शिबिरात तो गिर्यारोहण आणि रिव्हर राफ्टिंगचे प्रशिक्षण घेणार आहे.

हिमाचल प्रदेशातील मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स (ABVIMAS) ही देशातील प्रतिष्ठित साहसी क्रीडा प्रशिक्षण संस्था आहे. येथे गिर्यारोहण, ट्रेकिंग, स्कीइंग, रॉक क्लायम्बिंग आणि बचावकार्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. तर कुल्लू जिल्ह्यातील पिरडी येथील स्पोर्ट्स रिव्हर राफ्टिंग सेंटर हे बियास नदीतील जलसाहसी प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. अशा नामांकित केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी कृष्णाला मिळणार आहे.
देशसेवेचे स्वप्न, साहसाचे नवे दालन
कृष्णाचे स्वप्न सुरुवातीपासूनच पोलीस दलात किंवा भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे आहे. साहसी क्रीडा क्षेत्राबाबत त्याला फारशी माहिती नव्हती; मात्र या निवड प्रक्रियेमुळे त्याच्यासमोर एक नवे क्षेत्र खुले झाले आहे. गिर्यारोहण आणि रिव्हर राफ्टिंगसारख्या साहसी खेळांचा अनुभव घेण्याची संधी मिळत असल्याने तो आनंदी आहे. या प्रशिक्षणातून भविष्यात साहसी क्रीडा क्षेत्रातही काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उमेद निर्माण झाल्याची भावना कृष्णा याने ‘वणी बहुगुणी’शी बोलताना व्यक्त केली.

आपल्या या यशाचे श्रेय कृष्णा आपल्या आई-वडिलांसह प्रा. डॉ. प्रसाद खानझोडे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. निलिमा दवणे आणि डॉ. विकास जुनगरी यांना देतो. त्याच्या या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, प्राचार्य खानझोडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या कृष्णाच्या जिद्दीने आणि मेहनतीने साहसाचे नवे दालन खुले केले असून, मनालीच्या हिमशिखरांपासून कुल्लूच्या वेगवान जलप्रवाहापर्यंतचा त्याचा हा प्रवास भविष्यातील मोठ्या स्वप्नांची नांदी ठरणार आहे.


Comments are closed.