जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले आहे. आज आलेले सर्व रुग्ण हे आरटी-पीसीआर स्वॅब टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. यातील रवि नगर येथे 2 रुग्ण, साई नगरी येथे 1, गांडलीपुरा येथे 3, पटवारी कॉलनी येथे 1 व विठ्ठल वाडी येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या 8 रुग्णांमुळे वणी तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्येने द्विशतक गाठले आहे. सध्या तालुक्यात 204 कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. यात तालुक्याबाहेर टेस्ट करणा-या रुग्णांचाही समावेश आहे. तर तालुक्यात टेस्ट केलेल्या रुग्णांची संख्या ही 182 आहे.
यवतमाळ येथून 200 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी होते. त्यातील 29 रिपोर्ट आज प्राप्त झाले. त्यातील 8 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत, तर 21 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 13 व्यक्तींच्या रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. त्या सर्व व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. आज 62 जणांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. तालुक्यातून यवतमाळ येथे पाठवण्यात आलेले 233 रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत.
आज 15 रुग्णांना सुट्टी
आज 15 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 74 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 35 रुग्ण वणी तालुक्याच्या कोविड केअर सेन्टरमध्ये तर 11 रुग्ण यवतमाळ जीएमसी येथे उपचार घेत आहे. 20 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या तालुक्याबाहेर टेस्ट करून पॉजिटिव्ह आलेले रुग्ण 8 आहेत यातील चंद्रपूर येथे 2, नागपूर येथे 3, सावंगी मेघे येथे 1 व पांढरकवडा येथे 2 रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत. सावंगी मेघे येथील रुग्णाची टेस्ट काल निगेटिव्ह आल्याने त्याला काल सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनाने गाठले अवघ्या 8 दिवसात शतक
वणी तालुक्यात 20 जून रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी कोरोनाने शंभरी गाठली. मात्र त्यानंतर अवघ्या 8 दिवसात हा आकडा डबल होऊन आज 1 सप्टेंबर रोजी कोरोनाने द्विशतक पार केले. सुरुवातील शंभर रुग्ण होण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. मात्र त्यानंतरचे शंभर रुग्ण हे केवळ 8 दिवसात झाले. त्यामुळे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव किती झपाट्याने वाढत आहे याची प्रचिती येत आहे. मात्र सततची रुग्णसंख्या वाढत असूनही कोरोनाची आधी असलेली दहशत संपल्याने नागरिकांचे आवश्यक ती खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
दुकानाला 7 वाजेपर्यंत परवानगी व ई पास बंद
सरकारने कोरोनाविषयक जाहीर केलेल्या नवीन गाईडलाईननुसार आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. तसेच आता खासगी वाहनांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी सुरू असलेली ई पासची अट आता काढण्यात आली असल्याने आता नागरिकांना ई पास विना जिल्ह्याबाहेर प्रवास करता येणार आहे.
नवीन मार्गदर्शक तत्वानुसार सर्व शाळा, महविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इत्यादी बंद राहतील. पण ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. सर्व सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतीक, धार्मिक कार्य, इतर मेळावे आणि मोठ्या धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी राहील.
लग्न समारंभाच्या कार्यक्रमास वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. पण लग्न कार्यासाठी 50 व्यक्तीची अट कायम आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू इत्यादीच्या वापरास बंदी राहील. सध्या 7 वाजेपर्यंत दुकानास परवानगी देण्यात आली असल्यास गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे आढळल्यास बाजारपेठ व दुकाने बंद करण्याबाबतचे आदेश काढण्यात येतील असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूकीस टु व्हिलर- 1+1 व्यक्ती, थ्री व्हिलर 1+2 व्यक्ती, फोर व्हिलर 1+3 व्यक्ती या आसनक्षमतेसह मुभा राहील मुभा राहील. वाहन चालक व प्रवासी यांना मास्क वापरणे बंधनकारक राहील.