बहुगुणी डेस्क, वणी: येथील नांदेपेरा चौफुलीवर मंगळवारी एका कारमधून तीन लाख ६४ हजार ५५० रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी पोलीस व फिरत्या भरारी पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक धनराज हाके हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करीत असताना कारमधून (क्र. एमएच २९ बीपी २३२४) रोख रक्कम नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार नांदेपेरा मार्गावरील रेल्वे गेटजवळ सापळा रचून उपरोक्त क्रमांकाचे वाहन थांबविण्यात आले. या कारमध्ये रमेश लालचंद डुंगरवाल (रा. रवीनगर वणी), योगेश माधवराव करांडे (रा. जागृतीनगर, वणी) व धीरज भास्करराव सुत्रावे (रा. रंगारीपुरा, वणी) हे तिघेजण होते. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, वाहनात तीन लाख ६४ हजार ५५० रुपयांची रोकड आढळून आली. या रकमेबाबत चौकशी केली असता, ही रक्कम व्यवसायातून जमा झाल्याचे त्या तिघांनी पोलिसांना सांगितले. रमेश डूंगलवार व योगेश करांडे यांचा मारेगाव येथे ज्वेलरीचा व्यवसाय आहे, तर धीरज सुत्रावे यांचे मारेगावातच जनरल स्टोअर्स आहे. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन ती फिरत्या भरारी पथकाच्या पथक प्रमुखांकडे सुपुर्द केली. पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.