बहुगुणी डेस्क, वणी: बँकेतून काढलेली 50 हजारांची रोकड अज्ञात पाकीटमाराने लंपास केली. सोमवारी दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एसबीआय साई मंदिर शाखा ते दामले ले आऊट या भागात ही घटना घडली. राजूर येथील एका गरीब मजुराचे पैसे गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणामुळे बँकेबाहेर चोरटे सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. यावरून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
प्राप्त माहितीनुसार, विवेक महादेव वनकर (64) हे राजूर येथील रहिवासी असून ते मजुरी करून प्रपंच चालवतात. सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ते राजूर हून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साई मंदिर शाखेत गेले होते. त्यांनी बँकेतून 50 हजार रुपये काढले. काढलेले पैसे विवेक यांनी सोबत आणलेल्या पिशवीत ठेवले. विवेक यांचे जावई दामले फैल येथे राहतात. नातीची भेट घेण्यासाठी विवेक हे बँकेतून दामले फैल येथे गेले.
जावयाच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी पिशवी चेक केली. मात्र त्यांना धक्काच बसला. पिशवी खालून फाडलेली होती. तसेच त्यात ठेवलेली 50 हजारांची रोकड गायब होती. विवेक यांनी आलेल्या मार्गावर जाऊन पाहणी केली. तसेच रस्त्यावरील लोकांना विचारपूस केली. मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.
सीसीटीव्हीतून होणार चोरट्याचा पर्दाफाश?
गुन्ह्याला आळा घालण्यासाठी व गुन्ह्याची उकल होण्यासाठी वणीत ठिकठिकाणी 95 सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहे. नुकतेच या सीसीटीव्ही कॅमे-यातून मॉनिटरिंग करण्यासाठी वार रूम तयार करण्यात आली आहे. चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्यास सीसीटीव्हीचा मोठा फायदा होतो. गोरगरीबांचे पैसे चोरणा-या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान वणी पोलिसांसमोर आहे.
Comments are closed.