मोहुर्लीतील तरुणांच्या समयसूचकतेमुळे एका दुर्मिळ पक्षाला मिळाले जीवदान

ट्रकने धडक दिल्याने पक्षी जखमी, उपचारानंतर दोन दिवसांनी पक्षाची आकाशात भरारी

निकेश जिलठे, वणी: ट्रकने धडक दिल्याने जखमी झालेल्या एका दुर्मिळ जातीच्या पक्षाला मोहुर्लीच्या काही होतकरू तरुणामुळे जीवदान मिळाले. वायरटेल्ड स्वॉलो असे या पक्षाचे नाव आहे. सूरज मालेकर, शेखर सूर, पिंटू गौरकर या सुशिक्षित तरुणांच्या समयसूचकतेमुळे व पुढाकारामुळे जखमी पक्षाला वेळीच उपचार मिळाला. विशेष म्हणजे गुगल लेन्सच्या माध्यमातून त्यांनी या पक्षाची ओळख पटवली.

सविस्तर वृत्त असे की सूरज मालेकर, शेखर सूर, पिंटू गौरकर हे मोहुर्ली गावातील रहिवासी आहे. शुक्रवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास ते मोहुर्ली बसस्टँड जवळ गप्पा मारीत उभे होते. दरम्यान एक भरधाव ट्रकची रस्त्यावर उडणा-या एका पक्षाला धडक बसली. ट्रकची धडक लागल्याने पक्षी खाली पडला. त्यामुळे तिथे उभे असलेले सूरज, शेखर आणि पिंटू यांनी तात्काळ रोडवर पडलेल्या पक्षाकडे धाव घेतली.

गुगल लेन्सच्या माध्यमातून ओळख
अपघातग्रस्त पक्षी आकर्षक जरी असला तरी तो अनोळखी होता. त्यामुळे त्यातील एकाने पक्षाचा मोबाईलवर गुगल लेन्सदवारा फोटो क्लिक करून सर्च केला. त्यावरून त्यांना अपघातग्रस्त पक्षी हा वायरटेल्ड स्वॉलो असल्याचे कळले. या पक्षाच्या पाठीकडून चमकदार आणि पोटाकडून निळा पांढरा रंग असतो. या पक्ष्याच्या शेपटीतून दोन तंतुसारखी पिसं बाहेर आलेली असतात. ते पिसं तारासारखे दिसत असल्याने याला तारवाली असंही म्हणतात.

जखमी पक्षाच्या पायाला रक्त लागले होते. तसेच त्यांच्या पायाला सूज आल्याचे तरुणांना आढळले. त्यांनी पशवैद्यकीय चिकित्सालय येथे घेऊन गेले. पक्षी पाहताच डॉक्टरांनी मोहुर्लीच्या तरुणांना हा दुर्मिळ पक्षी असल्याचे व सदर पक्षी नर असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी पक्षाला पेनकिलर इन्जेक्शन दिले तसेच पायाला मलमपट्टी केली. त्यानंतर काही वेळात पक्षी हालचाल करू लागला. त्यानंतर एक तासांनी पक्षाने जागेवर भरारी घेण्यास सुरूवात केली.

पक्षावर उपचार करताना डॉक्टर

पक्षाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी पक्षाला तरुणांच्या स्वाधीन केले. त्यांनी पक्षाला गावात आणून घराच्या अंगणात एका पुठ्ठ्याच्या खोक्यात ठेवले. तिथे त्यांनी पक्षाला चारा व पाण्याची सोय केली. पक्षाच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली व रविवारी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी या तारवाली पक्षाने आकाशात झेप घेतली. मोहुर्ली येथील तरुणामुळे एका पक्षाला जीवदान मिळाले. त्यामुळे परिसरात या तरुणांचे कौतुक होत आहे. सदर पक्षी हा स्थलांतरीत पक्षी असून आपल्या देशात उत्तराखंड येथे हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतो. थंडीच्या दिवसात हा पक्षी आपल्या भागात येत असल्याची माहिती पक्षीप्रेमींनी दिली.

 

Comments are closed.