अखेर दिड महिन्यांनी अवतरल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका

तक्रार झाल्यानंतर अचानक ग्रामसेविका कार्यालयात हजर

भास्कर राऊत, मारेगाव: ग्रामपंचायतमध्ये रुजू होऊन दिड महिना झाल्यानंतरही ग्रामसेविका ग्रामपंचायतला रुजू होत नव्हत्या. अखेर सरपंच यांनी केलेली तक्रार तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश यामुळे तब्बल दिड महिन्यांनी ग्रामवासीयांना ग्रामसेविकेचे दर्शन झाले.

तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून कोसारा हे एक स्वतंत्र ग्रामपंचायत असलेलं गाव आहे. येथे सी. एन. भोयर हे ग्रामसेवक होते. त्यांची कोसारा या गावावरून बदली झाली. त्यांचे जागेवर राखी रेवतकर या ग्रामसेविकेला त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. पहिल्याच दिवशी दि. 4 ऑगस्टला या ग्रामसेविका कोसारा या गावामध्ये गेल्या व रुजू झाल्या. 6 ऑगस्टला मासिक सभा घेतली. खातेबदलचा ठराव घेतला. परंतु त्यांनी या गावाचा प्रभार काही घेतला नाही. तरीही त्यांनी काही लाभार्थ्यांच्या धनादेशावर सही केली.

यावर, सरपंच यांनी तुमचे खाते बदल व्हायचे आहे त्यामुळे तुमच्या सह्या चालत नाही असे सांगितले. मारेगाव पंचायत समितीच्या बैठकीत मात्र त्या सहभागी व्हायच्या. परंतु ग्रामपंचायतच्या मासिक सभा नाही की कोणतेही काम नाही. याविषयी विस्तार अधिकारी माने यांना वारंवार तोंडी तक्रार दिली. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून सरपंच पांडुरंग नन्नावरे यांनी गटविकास अधिकारी संजय वानखडे यांना दि. 16 ऑगस्टला तक्रार दिली.

गटविकास अधिकारी यांनी याविषयी ग्रामसेविका यांना जाब विचारताच दुसऱ्या दिवशी दि. 17 सप्टेंबरला सरळ दुपारी ग्रामसेविका ग्रामपंचायतला हजर झाल्या. त्यांच्या येण्याची पुसटशीही कल्पना नसल्याने सरपंच हे काही कामानिमित्त मारेगाव येथे आलेले होते. दुपारी ग्रामसेविका आल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने सरपंच यांना भ्रमणध्वनीवरून कळवले.

त्याचवेळी काही लाभार्थी हे ग्रामपंचायतमध्ये काही कामानिमित्त आलेले होते. त्यांनी या ग्रामसेविकेला माहिती विचारली असता तूमच्या ग्रामपंचायतचा माझ्याकडे प्रभार नाही, मी काहीही करू शकत नसल्याचे कळवले असे कळले. तसेच मी दुपारच्या वेळेसच कार्यालयात येईल असेही सांगितल्याचे सरपंच पांडुरंग नन्नावरे यांनी सांगितले.

काही का होईना, दिड महिना ग्रामपंचायत मधून गायब असलेल्या ग्रामसेविकेचे ग्रामपंचायतमध्ये आगमन झाल्याने आता तरी अडलेली कामे मार्गी लागतील अशी आशा ग्रामवासी करीत आहेत.

हे देखील वाचा:

प्रेमात पडून हाताशी धरला ‘यार’, नव-याच्या हत्याकांडात बायकोच सूत्रधार

रस्ता नसल्याने चिखल तुडवत जावे लागते अंत्ययात्रेला

Comments are closed.