मृतकाच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत न दिल्याचा आरोप
नवरगाव येथील सालगड्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू प्रकरण
विवेक तोटेवार, वणी: कायरजवळील नवरगाव येथील शेतशिवारात विजेच्या तारेच्या धक्क्याने विलास मोहूर्ले या सालगड्याचा मृत्यू झाला होता. वडिलांचा शेतात मृत्यू झाल्याने शेतमालकाने मदत करावी अशी मागणी मृतकाचा मुलगा ईश्वर मोहूर्ले याने केली आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरीब असून आईनंतर आता वडिलांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतमालकांनी मदत करावी अशी मागणी त्याने केली आहे. याबाबत शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करण्यात आली आहे.
वणी तालुक्यातील नवरगाव शेतशिवारात प्रभाकर भोयर यांचे डेअरी फार्म व शेती असून या ठिकाणी विलास गणपत मोहूर्ले हे गेल्या काही वर्षांपासून सालगडी म्हणून काम करीत होते. 4 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी मरण पावली होती. तेव्हापासून ते त्यांचा मुलगा ईश्वर मोहूर्ले (22) याला घेऊन शेतातील फार्म हाऊसवर राहत होते. ईश्वर हा कायर येथील एका दुकानात काम करतो.
दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास विलास यांचा मृत्यू झाला. दुपारी 12 च्या दरम्यान कायर येथे कामाला गेलेल्या मुलाला घ्यायला पाठविले. जेव्हा मुलगा आला त्यावेळी त्याला त्याच्या वडीलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. गावाकडील नातेवाईकास माहिती न देता पोलीस तक्रार व शवविच्छेदन करून प्रेत गावाकडे मालकाने पोहचविले असा आरोप ईश्वर याने केला आहे.
17 ऑगस्ट सोमवारी मुलगा ईश्वर मोहूर्ले, सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार, काका विकास मोहूर्ले, मारोती कंकलवार, नितेश येनुगवार यांचेसह घटनास्थळी पाहणीकरिता गेले. पाहणीत पिकाचे संरक्षणासाठी लावलेल्या बॅटरीचलीत तारेवर पोलवरील तार तुटल्याने करंट लागून मृत्यू झाल्याचे त्यांना आढळले.
इतके वर्ष काम करून जर त्या सालगड्याच्या कुटुंबियांना कोणतीही मदत शेतमालक प्रभाकर भोयर यांच्याकडून मिळालेली नाही. हा सर्व प्रकार शेतमालकाच्या बेजबाबदारीमुळे झाला असल्याचा आरोप ईश्वर मोहूर्ले याने केला आहे. त्यामुळे शेतमालकाने मदत करावी अशी मागणी त्याने केली आहे.
शेतमालक भोयर यांना विचारणा केली असता त्यांनी 1 लाख 10 हजार रुपये दिले असल्याचे सांगितले. तसेच पुढेही आवश्यकता असल्यास यांना मदत करणार असल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’ला दिली. पण ईश्वर यांच्या म्हणण्यानुसार जे पैसे दिले गेले ते त्यांच्या वडिलांच्या मजुरीचे होते. शेतमालकाकडे जमा असलेलेच पैसे त्यांनी परत केले आहे. त्यावर त्यांनी कोणतीही अधिकची मदत केलेली नसल्याचा दावा केला आहे.
तक्रार देण्यास गेल्यावर पोलिसांकडून दुर्व्यवहार ?
सोमवार 17 ऑगस्ट रोजी मोहूर्ले कुटुंबीय हे गावातील काही व्यक्तीसोबत वणीत आले. त्यांनी शेताची पाहणी करून महाराष्ट्र विद्युत महामंडळाची तार तुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे लक्षात आले. हा प्रकार मालकाच्या दुर्लक्षितपणामुळेमुळे घडला असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालकाचे विरुद्ध तक्रार देण्यास मृतकाचा मुलगा व सहकारी शिरपूर पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र ठाणेदार राऊत यांनी काहीही माहिती न घेता इथे कशाला आले? असे प्रश्न विचारीत पोलीस सहकाऱ्यांस बाहेर जिल्ह्यातून आल्यामुळे सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
परंतु सभापती विजय कोरेवार यांनी ई पास दाखविल्यानंतर इतरांना पोलीस स्टेशनचे बाहेर ठेऊन मृतकाच्या मुलाची तक्रार घेतली. तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका लोकप्रतिनिधी सभापती व नातेवाईकाला आरोपिसारखे वागणूक दिल्या गेली. तक्रारदाराला न मागता प्रथम खबरी अहवाल प्रत द्यायला पाहिजे पण ती प्रतसुद्धा तक्रारदार मुलास 5 दिवसानंतरही देण्यात आली नसल्याचा आरोप विजय कोरेवार यांनी केला आहे.