बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या शुल्लक वादातून एका शाळेच्या संचालकावर हल्ला करण्यात आला. मंगळवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी ही घटना घडली. या घटनेत शाळा संचालकांच्या डोळ्याला जखम झाली आहे. मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शाळा संचालकाच्या तक्रारीनुसार, विशाल खांदणकर (44) हे इंदिरा चौक येथील रहिवासी असून ब्लॅक डायमंड स्कूल या शाळेच्या इंदिरा चौक ब्रॅचचे ते संचालक आहे. त्यांच्या शाळेसमोर सध्या रस्त्याचे काम सुरु आहे. दु. 2.30 वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर शाळेतील मुलांच्या जाण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून खांदणकर मजुरांशी बोलत होते. त्यांनी मजुरांना रस्त्यावर पाइप टाकण्याबाबत विचारणा केली. दरम्यान शेजारी राहणारा संस्कार संजय गुरफुडे (वय 24) याला खांदणकर हे पाईप टाकण्यासाठी अडथळा निर्माण करीत असल्याचा गैरसमज झाला. त्यावरून संस्कारने खांदणकर यांच्या वाद घातला आणि शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.
वाद झाल्याने खांदणकर हे शाळेच्या कॅबिनमध्ये गेले. दरम्यान तिथे संस्कार व त्याचा भाऊ आदर्श संजय गुरफुडे (वय 26) लोखंडी रॉड घेऊन आले. त्यांनी कार्यालयाच्या कॅबिनची काच फोडली. तर त्यांचे वडील संजय बाळकृष्ण गुरफुडे (वय 50) यांनी शिवीगाळ केली. एकाने काचेचा तुकडा फेकत हल्ला केला. यात खांदणकर यांच्या डाव्या डोळ्याजवळ जखम झाली. तर काच फोडण्याच्या प्रयत्नात एकाला ईजा झाली. कॅबिन बंद असल्याने हल्लेखोर आत प्रवेश करू शकले नाहीत. पोलिसांनी खांदणकर यांच्या तक्रारीवरून आदर्श संजय गुरफुडे, संस्कार संजय गुरफुडे आणि संजय बाळकृष्ण गुरफुडे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 125(बी), 3(5), 324(4), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
संस्कार गुरफुडे यांच्या तक्रारीनुसार, वणीतील इंदिरा चौक परिसरात त्यांचे नाष्ट्याचे दुकान आहे. त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर पाइप टाकण्याचे काम सुरु असताना खांदणकर यांनी मजुरांना धमकावले. दरम्यान संस्कारचे वडील संजय गुरफुडे यांनी मुजरांना काम सुरु ठेवा असे म्हणताच खांदणकर यांनी संस्कारच्या वडिलांना शिवीगाळ केली. यानंतर खांदणकर हे शाळा कार्यालयात गेले. तिथे त्यांनी त्यांच्या हाताने कॅबिनची काच फोडली. काचेच्या तुकड्याने त्यांनी संस्कार याच्यावर हल्ला केला. यात संस्कार याच्या हाताला जखम झाली. या प्रकरणी विशाल खांदणकर यांच्यावर बीएनएसच्या कलम 118(1), 296, 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांआधी विशाल खांदणकर यांच्याविरोधात एक ऍट्रोसिटिचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सदर तक्रार खोटी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणी गुरफुडे कुटुंबातील काही व्यक्तींनी खांदणकर यांच्याविरोधात साक्ष दिली होती. असे खांदणकर यांचे म्हणणे आहे. तर खांदणकर यांच्या शाळेची माहितीच्या अधिकारात वारंवार मागणी केल्याने खांदणकर हे राग मनात धरून वाद करीत असतात. असे गुरफुडे यांचे म्हणणे आहे.



Comments are closed.