आपट्याच्या फांद्यांवरील फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात

प्रजनन काळातच होते आपट्यांची वृक्षतोड

तालुका प्रतिनिधी, वणी: दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची आणि वाटण्याची परंपरा आहे. या दिवशी आपट्याची पूजाही केली जाते. त्यामुळे दस-याच्या काळात फार मोठ्या प्रमाणात बहुगुणी आपट्याच्या झाडाची तोड केली जाते. मात्र नकळतपणे या कालावधीत आपट्याच्या झाडांवर वास्तव्य करणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

तसे आपट्याचे झाड हे दुर्मिळच मानले जाते. बाभळी किंवा इतर झाडांसारखे ते प्रत्येक ठिकाणी आढळत नाही. वणी परिसरात मेढोली, शिरपूर, पिंपरी, बोरगाव, कायर, शिंदोला इ भागात शेत शिवारात आढळून येते. जंगलातही थोड्या प्रमाणात आढळते मात्र त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मारेगाव आणि झरी तालुक्यातील शिवारातही आपट्यांची झाडे आढळून येते. 

साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा एक प्रमुख मुहूर्त मानल्या जातो. या दिवसाच्या निमित्ताने आपट्याच्या झाडांची बेसुमार तोड होते. हा वृक्ष जंगलात आणि शेतशिवारात आढळतो. भारतात असंख्य प्रकारची फुलपाखरे आहेत. प्रत्येक फुलपाखरांच एक आवडीचं झाड असते. लिंबू, चिंच, सीताफळ, मेहंदी आणि शिवारात या महिन्यात फुलांवर येणारी छोटी छोटी झाडे फुलपाखरांचे खाद्य आहेत.

आपटा फुलपाखरांचे खाद्य आहे. ट्रायकलर प्रजातीच्या फुलपाखरांच्या मादी आपट्याच्या झाडांवर अंडी घालतात. त्यातून अळी बाहेर येते. आपट्याची कोवळी पाने खाऊ लागते. अळीचे रूपांतर कोषात होते. कोषातून फुलपाखरु बाहेर पडते. साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचा काळ अनेक फुलपाखरांसाठी प्रजननाचा काळ असतो. नेमक्या याच काळात दसरा सण येतो. आपट्याच्या पानाचा वापर सोन्याचे पान म्हणून केला जातो. परिणामी फुलपाखरांचा निवारा धोक्यात येत आहे.

आपट्याची पाने, फांद्या तोडल्याने अळी, अंडी, कोष नष्ट होते. यामुळे आपटा वृक्षासह फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. वृक्षतोडीमुळे या काळात अनेक शिवारात आपट्याच्या झाडाखाली फुलपाखरांची अंडी, कोष आढळून येते. 

आपट्याचे झाड औषधी आहे. हगवण, जुलाब यांसारख्या पचनसंस्थेच्या रोगांवर आपट्याच्या सालीचा रस गुणकारी ठरतो. तसेच स्तंभक म्हणूनही या वनस्पतीचा उपयोग होतो. आपट्याच्या सालीपासून टॅनीन, धागे व डिंक मिळवितात. विड्या तयार करण्यासाठीही आपट्याची पाने वापरतात.

अशा या बहुगुणी आपट्याची रोपे एकमेकांना भेट देऊन त्याची लागवड केल्यास संस्कृत भाषेत ‘वनराज’ म्हणून गौरविण्यात आलेल्या वृक्षांचे जतन होऊ शकते.

हे देखील वाचा:

मयूर मार्केटिंगमध्ये दस-यानिमित्त महासेल

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दसरा धमाका’ ऑफर लॉन्च

Comments are closed.