बहुगुणी डेस्क, वणी: कोरोनाच्या भयंकर विळख्यातून सुटून तालुका आता बराच सावरला आहे. त्यातच संपूर्ण वणी तालुक्यात चिकनगुनिया डोके वर काढत आहे. आरोग्य विभागाकडून योग्य पावले उचलली जात नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार आक्रमक झालेत. त्यांनी या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले.
आजपर्यंत आरोग्य विभागामार्फत कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबवल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच खेडेगावांमध्ये आवश्यक त्या फवारण्यासुद्धा केलेल्या नाहीत. या चिकनगुनियाची साथ तालुक्यातील बोर्डा या गावात जास्त प्रमाणात पसरली आहे. बोर्डा गावात चिकनगुनिया या रोगाने शेकडो रुग्ण प्रभावित आहेत. कोणतेही वैद्यकीय अधिकारी किंवा पथक तिथे गेलेले नाही.
मनसेने निवेदनामध्ये वणी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये वैद्यकीय तपासणीची मागणी केली आहे. तिथे पथक पाठवून रुग्णांची तपासणी करावी. ज्या गावांमध्ये चिकनगुनियाचे रुग्ण आहेत, त्यांच्यावर योग्य उपचार करावेत. प्रत्येक गावात फवारणी करावी. अशा अनेक मागण्या झाल्यात.
या मागण्या पूर्ण न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल. यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास आरोग्य विभाग स्वतः जबाबदार राहील. असा इशाराही दिला आहे. निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, लक्ष्मण उपरे, योगेश माथनकर, गणेश भोंगळे, कैलास निखाडे, प्रतीक पानघाटे, प्रवीण कळसकर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.