शहरात वाहू लागले निवडणुकीचे वारे; पक्ष प्रवेश मेळाव्यातून मोठमोठे दावे…

मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन जोमात, धरणे प्रदर्शन कोमात...

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी शहरातील जैताई नगर येथील नगरवाला जिनिंग जवळ पक्ष काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 300 लोकांनी पक्ष प्रवेश केल्याचा दावा यावेळी केला गेला. मात्र ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यातील अनेकांनी त्यांना पक्षप्रवेश मेळावा असल्याची कल्पनाच नसल्याचा आरोप जैताई नगर येथील काही रहिवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या 4.5 वर्षांत कोणत्याही स्थानिक प्रश्नांवर नेते, पदाधिका-यांनी कोणतेही आंदोलन केले नाही, त्यामुळे मोठ मोठे दावे करून केवळ शक्ती प्रदर्शनाचा तर प्रयत्न सुरू नाही, अशी चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

जैताई नगर हा वार्ड आधी काँग्रेसचे दिवंगत नेते सतीशबाबू तोटावार यांच्या गड मानला जायचा. या परिसरात मोठ्या प्रमाणात तेलूगू भाषिक लोक राहतात. याशिवाय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा देखील हा परिसर असल्याने जैताई नगर वार्डाला चांगले महत्त्व आहे. मात्र अलिकडे या प्रभागात भाजपने वर्चस्व निर्माण केले. या परिसरात काँग्रेसने पक्ष प्रवेश मेळावा आयोजित करून शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्याची चर्चाही झाली. 300 व्यक्तींनी पक्ष प्रवेश केल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला.

जैताई नगर येथील एका व्यक्तींने निवडणुकीला यावेळी उभे राहण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून तुम्ही या बैठकीला या असे परिसरातील नागरिकांना आमंत्रण दिले. मात्र जेव्हा स्थानिक लोक बैठकीच्या स्थळी पोहोचले. तो पर्यंत त्यातील अनेकांना हा पक्षप्रवेश सोहळा असल्याची कल्पनाच नव्हती, पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असल्याचे लक्षात घेतात अनेकांनी अर्ध्यातूनच काढता पाय बाहेर काढण्यात धन्यता मानली, अशी माहिती काहींनी दिली.

जैताई नगरच्या पक्ष प्रवेश मेळाव्यात अनेक लोक दुस-या वार्डातील होते. विशेष म्हणजे ज्या लोकांनी प्रवेश केला असे जाहीर करण्यात आले, त्यातील काही लोक तर मेळाव्याला उपस्थितच नसल्याची माहिती आहे. याच मेळाव्यात शिवसेनेच्या एका नेत्याच्या नातेवाईकाचा या ठिकाणी सत्कार करण्यात आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र नंतर त्यांनी घुमजाव करत पक्ष प्रवेश केला नसल्याचे जाहीर केले.

नगर पालिकेत काँग्रेसची सातत्याने पिछेहाट
गेल्या काही वर्षापासून सातत्याने काँग्रेस पक्षाची शहरात पिछेहाट झाली. गेल्या नगर पालिका निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. त्याआधी 2011 च्या निवडणुकीत काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर 2006 च्या नगरपालिका निवडणुकीत अवघ्या 3 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले होते. त्या वेळी राष्ट्रवादीने काँग्रेसशी युती करून सत्ता स्थापन केली होती. केवळ एकदा काँग्रेस आणि रिपाई युतीच्या 13 जागा आल्या होत्या. तेव्हा पासून काँग्रेसची घसरगुंडी असून गेल्या 20 वर्षांमध्ये काँग्रेसची सातत्याने पिछेहाट होत आहे.

स्थानिक समस्यांवर आंदोलनच नाही
अलिकडेच आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसने पक्ष प्रवेश मेळाव्याला सुरूवात केली. गेल्या दीड महिन्यात सुमारे 600 व्यक्तींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला आहे. शहरात खड्ड्याचे साम्राज्य आहे. ठिकठिणाणी कचरा साचलेला असतो. डुकरांचा सुळसुळाटाची समस्या अद्यापही सुरूच आहे. भर पावसाळ्यातही ही समस्या सोडवली गेली नाही. सध्या शहरात डेंग्यू आणि मलेरियाचे थैमान आहे. एकीकडे 600 लोकांनी काँग्रेस प्रवेशाचा दावा करीत असतानाच दुसरीकडे मात्र काँग्रेसचे पदाधिकारी यांनी स्थानिक पातळीवरील लोकांच्या प्रश्नांवर एकही आंदोलन केलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे केवळ काँग्रेसच नाही तर इतर विरोधी पक्षांनीही स्थानिक समस्येवर विशेष आंदोलन केलेले नाही. 

अलिकडे नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची कमान सांभाळताच हाय कमांडच्या आदेशावरून केंद्र सरकारविरोधात जे काही आंदोलन झाले तेच आंदोलन स्थानिक काँग्रेसच्या नावावर आहे. मात्र स्थानिक पातळीवरील कोणतेही आंदोलन स्थानिक नेते, पदाधिका-यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर नाही. त्यातच आता पक्ष प्रवेश प्रवेशाचा सपाटा लावण्यात आला आहे. एकीकडे धरणे प्रदर्शनात कुठेही नाही, शक्ती प्रदर्शनात पुढे अशी परिस्थिती काँग्रेसची झाली असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. आता या प्रयत्नांचा काँग्रेसला किती फायदा होईल हे पुढील काळात स्पष्ट होईल.

Comments are closed.