आज सकाळी 10 वाजता विद्यार्थी व पालकांचा मूक मोर्चा

DAV शाळा भालर येथे स्थानांतरीत करण्याची मागणी... सेवा, जमीन आमची आणि सोयी दुस-यांना - पालक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील सुंदरनगर येथील वेकोलिची डीएव्ही या शाळेचे घुग्गुस येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याविरोधात तालुक्यातील पालक संतप्त झाले आहेत. हा निर्णय तात्काळ बदलवून सदर शाळा ही भालर येथे स्थानांतरीत करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. याबाबत आज वणीत पालक व विद्यार्थ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता हा शिवतीर्थावरून या मोर्चाला सुरूवात होणार आहे.

सुंदरनगर येथील डीएव्ही स्कूल ही परिसरातील एक नामवंत शाळा आहे. अत्यल्प शुल्कामध्ये येथे दर्जेदार शिक्षण मिळते. वणी व परिसरातील सर्वाधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. वेकोलिच्या खाणीतून होणा-या ब्लास्टिंगचा या शाळेच्या इमारतीवर परिणाम झाला असून यात शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही शाळा सध्या घुग्गुस येथे स्थानांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

या शाळेत वणी तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असताना तसेच घुग्गुस व परिसरातील अत्यल्प विद्यार्थी संख्या असतानाही शाळा घुग्गुस येथे का स्थानांतरीत करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करत पालक संतप्त झाले आहे. शाळेतील विद्यार्थी हे वणी सर्कलमधील आहे. त्यामुळे प्रवासाच्या दृष्टीने ते सोयीस्कर नाही. शिवाय देशातील सर्वात प्रदूषित गावांमध्ये घुग्गुसचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते धोकादायक आहे. असा आरोप करत संतप्त पालकांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

सेवा, जमीन आमची आणि सोयी दुस-यांना – पालक
वणी सर्कलमधील वेकोलिला कायमच सहकार्य केले आहे. अनेक शेतक-यांच्या जमिनी वेकोलिमध्ये गेल्या आहेत. परिसरातील अनेक लोक वेकोलिला सेवा देत आहे. वकोलिच्या प्रगतीत स्थानिकांचा मोठा हातभार आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी सदर शाळा सुरू करण्यात आली आहे. मात्र याचा वेकोलिला विसर पडला असून सदर शाळा तालुक्यातच राहिली पाहिजे अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.

मूक मोर्चा हा सकाळी 10 वाजता शीवतिर्थावरून निघणार असून खाती चौक, गांधी चौक, तुटी कमान, टागोर चौक, आंबेडकर चौक यामार्गे फिरून तहसील कार्यालयावर हा मोर्चा पोहोचणार आहे. येथे एसडीओ यांना विविध मागण्यांचे पालकांद्वारा निवेदन दिले जाणार आहे.

Comments are closed.