महाविकास आघाडी सरकार अमरपट्टा घेऊन आली नाही- देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण

जितेंद्र कोठारी, वणी: आज रोजी राज्यात महाविकास आघाडीची सरकार आहे, उद्या आमची सरकार येईल. महाविकास आघाडी सरकार शासन करण्याचा काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. परिवर्तन हे लोकशाहीचे नियम आहे. असे उद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते आज वणीत पावणे दोन कोटीच्या निधीतून उभारण्यात आलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या लोकापर्ण सोहळ्यात बोलत होते.

पुढे म्हणाले की सत्तेत असताना आम्ही जनतेसाठी काम केले आणि सत्तेत नसताना जनतेसाठी संघर्ष करीत आहो. गेल्या 2 वर्षापासून राज्य शासनाने शेतकऱ्याना एक नवा पैसा मदत केली नाही. आघाडी सरकारचे मंत्री फक्त टीव्ही पुढे मोठी मोठी घोषणाबाजी करतात आणि नंतर काहीही करत नाही. असा ही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. स्वराज्याचे रूपांतर सुराज्यमध्ये करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक नियम तयार केले होते. असेही फडणवीस यांनी सांगितले. मागील एक महिन्यात राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान लोकार्पण प्रसंगी माजी गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे अध्यक्ष स्थानी होते. तर आमदार अशोक उइके, आमदार रणजीत पाटील, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार संदीप धुर्वे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे , अण्णासाहेब पारवेकर, दिनकर पावडे, विजय चोरडिया, विजय पिदूरकर, जि. प. सदस्य मंगला पावडे, रवी बेलूरकर हे मंचावर उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांनी मुख्य अतिथि देवेंद्र फडणवीस यांचे शाल, श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केले. तसेच कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अशोक उइके, रणजीत् पाटील, हंसराज अहिर, अण्णासाहेब पारवेकर व इतर मान्यवरांचे नगरपरिषद सदस्यानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

यावेळी वणी नगर परिषदचे सर्व नगरसेवक, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील भाजप पदाधिकारी, भाजप व्यापारी आघाडीतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण करताना नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी मागील 5 वर्षात वणी शहराचा चेहरा मोहरा कश्याप्रकारे बदलण्यात आला याबाबत देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार व माजी खासदार हंसराज अहिर यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले. लोकार्पण सोहळा प्रसंगी वणी शहरासह वणी, मारेगाव व झरी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमनंतर भाजप शहर अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

वणी शहरात आगमनपूर्वी देवेंद्र फडणवीस निलापूर गावात जाऊन तिथे अतिवृष्टीपासून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसणाची पाहणी केली.

वंचित आघाडीचे निदर्शने 
देवेंद्र फडणवीस शहरात येण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्ते बॅनर घेऊन टिळक चौक येथे पोहचले व त्यांनी ‘फडणवीस गो बॅक’, ओबीसीची वेगळी जनगणना झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. वणी पोलिसानी वंचितच्या सर्व कार्यकर्त्याना ताब्यात घेऊन स्थानबद्द केले. मात्र कार्यक्रम स्थळी देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे होताच काही लोकानी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, ओबीसीची स्वतंत्र जनगणना झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी केल्याने पोलिस यंत्रण सजग झाली. कार्यक्रम स्थळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यानी तात्काळ घोषणाबाजी करणाऱ्या शेतकरी रुद्रा कुचनकर याला कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढले.

Comments are closed.