संधिवात म्हणजे काय? कसा होतो बरा… वाचा ऑर्थो सर्जन डॉ. अविनाश देठे यांचा ब्लॉग

किती प्रकारचे असतात संधिवात? काय आहेत या आजारावर उपाय? आयुर्वेदिक उपचार किती फायदेशीर?

बहुगुणी डेस्क, वणी: आज पासून आपल्या ‘वणी बहुगुणी’ पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉगचा सिजन 2 सुरू होत आहे. यात वणीतील ऑर्थोपेडिक सर्जन (हाडरोग तज्ज्ञ) व प्रकाश ऑर्थोपेडिक क्लिनिकचे संचालक डॉ. अविनाश देठे (MBBS, D. Ortho, FJRS (Mumbai रोबोटीक ऍन्ड कव्हेंन्शनल Knee Surgen) हे हाडांवरील विविध आजारांबाबत आपल्याला माहिती व उपचार पद्धती सांगणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ते संधिवात म्हणजे नेमके काय? हा आजार कसा होतो? महिलांना हा आजार जास्त का होतो? यावर उपाय काय आहेत. संधिवातामध्ये नेमकी कशी काळजी घ्यावी, घरगुती उपाय, यासाठी ते काही खास टिप्स देणार आहेत. तसेच अनेक रुग्ण यावर आयुर्वेदिक व गावठी उपचार करतात. हा उपचार प्रभावी आहे का? याबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत.

सर्वात आधी आपण संधिवात म्हणजे काय हे जाणून घेऊया? थोडक्यात सांगायचे तर शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदना होणं याला संधिवात म्हणतात. इंग्रजीत त्याला जॉइंट पेन तर वैद्यकीय भाषेत त्याला ‘आर्थरायटीस’ म्हणतात. हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार मानला जातो. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा हा आजार आहे. बहुतेक वेळा ही समस्या वय वर्ष 40 नंतर सुरु होते. हल्ली कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय महिलांना हा आजार अधिक प्रमाणात होतो.

संधिवात झाला कसे ओळखावे, काय असते लक्षणे
संधिवाताची अनेक लक्षणे आहेत. मात्र, प्रामुख्याने चालताना, बसताना त्रास होतो. हाडांमधून बसताना कट कट आवाज य़ेतो. खूप वेळ एकाच जागी बसले तर अचानक उठण्यास त्रास होतो. मांडी न घालता येणे, सकाळी व रात्री अचानक हाडे दुखणे, सूज, सांध्यांजवळचा भाग लाल होणं, चालण्या-फिरण्यात किंवा हालचाल करण्यात येणारा अडथळा हे मुख्य लक्षणं आहेत. याशिवाय डोळे व तोंड कोरडे पडणे, हातापायांना मुंग्या येणे, भूक कमी होणे, थकवा, अशक्तपणा, त्वचेवर गाठी येणे असे देखील अनेक लक्षणे आहेत.

 

संधिवात का होतो?
संधिवाताची अनेक कारणे आहेत. आपण एका गाडीचे उदाहरण घेऊ. गाडीला टायर असते. काही वर्षांनंतर प्रवासाने गाडीचे टायर खालून झिजते. अगदी तसेच आपल्या शरीरातील हाडांचे असते. वाढत्या वयोमानानुसार आपल्या हाडांची झिज सुरू होते. यामुळे सांधेदुखी सुरु होते. वैद्यकीय भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या शरीरातील दोन सांध्यांमध्ये एक द्रव पदार्थ असतो. हा थर एक ल्युब्रिकंट म्हणून काम करतो व सांध्यांना एकमेकांवर घासण्यापासून सुरक्षा देतो. (जसे ग्रीस किंवा ऑइल घर्षण रोखण्यास मदत करते.) वयोमानानुसार सांध्यांमधील जागा कमी होते. त्यामुळे सांध्यांमधील द्रव पदार्थाचं प्रमाण कमी होत जातं. यामुळे सांधे जास्त संवेदनशील बनतात व सांध्याची झिज होते. बऱ्याच वेळा इतर आजारांमुळे देखील संधिवात होतो. याशिवाय अनुवांशिकता व बदलती जीवनशैली हे देखील संधिवाताचे कारण मानले जाते.

संधिवात किती प्रकारचा असतो?
आर्थरायटीसचे शेकडो प्रकार आहेत. ऍन्कलूझिंग स्पॉन्डिलोसिस, ऑस्टेओ-आर्थरायटीस, रुमेटाईड आर्थरायटीस, लहान मुलांमध्ये आढळून येणारा इडिओपॅथीक आर्थरायटीस, रिऍक्टिव्ह आर्थरायटीस, सेप्टिक आर्थरायटीस, गाऊट आणि पॉली आर्थरायटीस इत्यादी. पण यातील ऑस्टेओ-आर्थरायटीस आणि रुमेटाईड आर्थरायटीस हे दोन प्रकार भारतात सामान्यत: बहुतांश रुग्णांमध्ये आढळून येतात.

रुमेटाईड आर्थरायटीस यात शरीरातील विविध सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. गुडघे, हात आणि बोटांमध्ये रुमेटाईड आर्थरायटीस जास्त होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये ताठरता (stiffness) जाणवते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही वयोगटात हा आजार होऊ शकतो. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये रुमेटाईड आर्थरायटीसचं प्रमाण तीन पट जास्त आहे. महिलांना लहान वयातच हा आजार होतो. या प्रकारात रुग्णांना थकवा जाणवतो. अनेक रुग्णांमध्ये सांधेदुखीपेक्षा वेगळी लक्षणं दिसून येतात. त्वचा, डोळे, फुफ्फुस, हृदय, किडणी, लाळ ग्रंथी, बोन मेरो, रक्तवाहिण्या प्रभावित होतात. संधिवातात लाल रक्तपेशींची संख्या कमी होते, ज्याला ऍनिमिया म्हणतात. यावर वेळेत उपचार न केल्यास आजार वाढून सांधे विकृती देखील होते.

ऑस्टेओ-आर्थरायटीस हा प्रकार वाढणारं वय, शरीराची हालचाल आणि शरीराची होणारी झीज या कारणांमुळे होतो. हा साधारणपणे 40 वर्षांनंतर होतो. याचा मुख्यतः पाठीचा खालचा भाग, कंबर, नितंब, हात, मान आणि गुडघे यावर परिणाम होतो. पुढे हे वाढत जाऊन बोट, मनगट आणि हातांवरही परिणाम करतात. गुडघे शरीराचं संपूर्ण वजन पेलतात. सांध्यांची झीज झाल्यामुळे गुडघ्यांना सर्वात आधी त्रास होण्याची शक्यता असते. काही लोकांमध्ये हा आजार इतका बळावतो की, गुडघे बदलाची (Knee Replacement) शस्त्रक्रिया करावी लागते. पुरूषांच्या तुलनेत ऑस्टेओ-आर्थरायटीसग्रस्त महिलांना अत्यंत तीव्र वेदना होतात. भारतात 22 ते 39 टक्के लोक ऑस्टेओ-आर्थरायटीसने ग्रस्त आहेत.

इडिओपॅथीक आर्थरायटीस 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना होतो. यात मुलींची संख्या जास्त आहे. यात सामान्यत: गुडघे, घोटे आणि मनगट प्रभावित होते. जबडा, मान, खांदे आणि नितंबांवरही याचा परिणाम होतो. अनुवांशिकता हे देखील या प्रकारच्या संधिवाताचे कारण असू शकते. गाऊट हा प्रकार देखील आर्थरायटीसचा एक प्रकार आहे. अति-जास्त प्रमाणात मांसाहार आणि मद्यपान करणाऱ्यांना या आर्थरायटीसचा धोका जास्त आहे. यात शरीरात मोठ्या प्रमाणात युरिक अॅसिड तयार होतं. त्याचा सांधे आणि हृदयावर परिणाम होतो. किडनी विकार आणि काही आजारांमुळे गाऊट होण्याची शक्यता असते.

 

काय आहेत संधिवातावर उपचार ?
सर्वात आधी रुग्णांची शारीरिक तपासणी केली जाते. त्यानंतर ईएसआर किंवा सीआरपी, रुमॅटॉईड फॅक्टर (आरएफ) सारख्या चाचण्या केल्या जातात. अनेकदा चाचण्या अचूक येत नाही. त्यामुळे काही वेळा अधिक अचूक निदान करण्यासाठी अन्टी-सीसीपी अ‍ॅन्टिबॉडीज्सारख्या रक्तचाचण्या देखील केल्या जातात. सोबतच एक्स-रे, एमआरआय व अल्ट्रासाऊंड तपासण्यातून निष्कर्षापर्यंत पोहचता येते. शारीरिक तपासणी व टेस्ट नंतर ज्या प्रकारच्या संधिवाताचे निदान होते. त्यानुसार उपचार केला जातो.

घरगुती किंवा प्राथमिक अवस्थेतील उपचार  
व्यायाम: संधिवातात व्यायाम हा एक प्रभावी व पुरक उपचार मानला जाते. व्यायामामुळे सांध्यातील ताठरता कमी होण्यास मदत होते आणि सांध्यांची हालचाल सुधारते. त्यामुळे शरीराची हालचाल करत राहा. रोजची काम सुरू ठेवा. वॉक, सायकलिंग, स्ट्रेचिंग आणि स्नायूंना बळकट करण्याचे व्यायाम करा. मुख्यत: वजन आटोक्यात ठेवा. 

आहार: ताज्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करणे, सोबतच कॅल्शियम व व्हिटॅमिन डी सारख्या घटकांनी युक्त पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्य देणे. मासे व ओलिव्ह ऑईलसारखे ओमेगा-3 युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि सॅच्युरेटेड फॅटयुक्त पदार्थ, फास्ट फूड इत्यादींचे सेवन टाळणे आवश्यक आहे.

ताणतणाव व्यवस्थापन: संधीवातावर उपचार दीर्घकालापर्यंत करावे लागू शकतात. त्यामुळे मानसिक ताण निर्माण होतो. त्याचा रोजच्या जीवनशैलीवर परिणाम पडतो. त्यामुळे आणखी ताण वाढतो. त्या अनुषंगाने ताणतणाव व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उदा. छंद जोपासणे, ध्यान करणे इ. हे सर्व उपाय प्राथमिक स्टेजमध्ये करता येऊ शकते. मात्र सांधेदुखी जर थांबली नाही किंवा वाढत असेल तर मात्र रुग्णांना वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. किंवा वैद्यकीय उपचार सुरु असताना देखील हे उपचार फायद्याचे ठरतात. 

आयुर्वेदीक किंवा गावठी उपचार?
वाढत्या वयोमानानुसार सांध्यांची झिज होतच राहते. त्यामुळे संधिवात हा आजार कायमचा नष्ट करता येत नाही. मात्र तो 100 टक्के आटोक्यात आणता येतो. अनेकदा संधिवाताकडे दुर्लक्ष केले जाते. काही रुग्ण आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा गावठी उपचार पद्धती अवलंबतात. मात्र या उपचार पद्धतीचे कोणतेही रिसर्च झालेले नाही. त्यामुळे हा संधिवातावरचा उपाय नाही. अनेकदा चुकीच्या उपचार पद्धती वेळ गेल्याने हाडांची झिज वाढतच जाते. अनेकदा सांधे विकृत होई पर्यंत हा आजार वाढत जातो. मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे वाढत्या वयोमानानुसार किंवा संधिवाताचे प्राथमिक लक्षणं आढळल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. रोज व्यायाम करा. पोषक आहार घ्या. अति-जास्त प्रमाणात मांसाहार आणि मद्यपान टाळा. 

(रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉ. अविनाश देठे यांना संपर्क साधता येईल.)

अधिक माहितीसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क –
प्रकाश ऑर्थोपेडिक क्लिनिक 
पत्ता – श्री साई मंदिर चौक, यवतमाळ रोड
नवीन समाधा डेली निड्सच्या बाजूला, वणी
वेळ – स. 10 ते दु. 1 संध्या. 6 ते रा. 9 

पूर्व नोंदणी साठी संपर्क: 9209423636 

Comments are closed.