ओबीसींनी सतत जागे राहणे गरजेचे :प्रा. डॉ. हरी नरके

वणीत मंगळवारी पार पडले डॉ. हरी नरके यांचे व्याख्यान

विवेक तोटेवार, वणी: ओबीसी हेच देशाचे निर्माणकर्ते आहेत. मात्र तरीही ओबीसींकडे कायम दुर्लक्ष केले जाते. व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करणे ही आजची गरज आहे. जो पर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत आपल्याला आपली भूमिका सातत्याने मांडावीच लागणार आहे. असे प्रतिपादन डॉ. हरी नरके यांनी केले. मंगळवारी 10 जानेवारी रोजी वणीतील गव्हर्नमेंट हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. बेलदार समाज बहुद्देशीय संस्थेद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पहिली मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंती प्रित्यर्थ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बेलदार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगीनवार, तर उदघाटक म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार होते. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन चंदावार यांनी केले.

डॉ. हरी नरके म्हणाले की देशात 52 टक्के असलेल्या समाज शासनाच्या सुविधांपासून वंचित आहे. त्यांचे जीवनमान उंचवण्याकरिता या समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रमाणेच देशात ओबीसी आयोग आहे. परंतु अनुसूचित जाती व जमातीची जनगणना होत असली तरी ओबीसी समाजाची का होत नाही? असा सवाल त्यांनी आपल्या व्याख्यानात उपस्थित केला. ओबीसींना शिक्षण, आरोग्य यापासून वंचित ठेऊन त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न ओबीसींनीच हाणून पाडायला पाहिजे. त्यासाठी ओबीसींना सतत जागे राहण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

आमदार बोदकुरवार यांनी आपल्या भाषणात दादासाहेब कन्नमवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याकरिता प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत जांभलीवार व पाहुण्यांचे आभार राकेश बरशेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाला नगर परिषदेचे माजी सभापती राकेश बुग्गेवार, बेलदार समाज महिला कार्यकारीणीच्या अध्यक्षा अल्का दुधेवार व इतर अनेक ओबीसी, एसबीसी व व्हिजेएनटी संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.