तान्हा पोळ्याच्या दिवशीच अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या

कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केल्याचा अंदाज

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पठारपूर येथील एका अल्पभूधारक शेतक-याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तान्हा पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुनील भाऊराव उलमाले ( वय अंदाजे 38) असे मृताचे नाव आहे. त्यांच्याकडे 3 एकर शेती होती. तर चार एकर शेती त्यांनी ठेक्याने घेतली होती.

दिनांक 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास सुनील यांनी गोठ्यात ठेवलेले विषारी औषध आणले व घरासमोर येऊन पिले. त्यांनी विष प्राशन केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांना शेजारी व नातेवाईकांच्या मदतीने कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना वणी येथे रेफर करण्यात आले.

त्यांना वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांना पश्चात पत्नी व दोन मुली आहेत. विष प्राशन करण्याआधी ते डोक्यावर कर्ज असून हे कर्ज आता फेडू शकत नाही, असे बोलत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. ऐन सणाच्या दिवशीच सुनील यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.