शाळेच्या पेपरला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

अज्ञाताविरोधात फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल

वणी बहुगुणी डेस्क: शाळेच्या परीक्षेचा शेवटचा पेपर आहे असे सांगून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी (14) घरी परत आलीच नाही. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की पीडितेचे वडील हे वणी येथील रहिवासी आहे. त्यांची मुलगी 14 वर्षांची असून ती वणीतील एका शाळेत 9 व्या वर्गात शिकते. शुक्रवारी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी मुलीचे वडील हे कामासाठी घरून निघाले. सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी शाळेला जातो म्हणून स्कूल युनिफॉर्ममध्ये शाळेसाठी निघाली. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास तिचे वडील कामाहून घरी परत आले. तेव्हा त्यांना त्यांची मुलगी घरी आढळून आली नाही.

याबाबत त्यांनी त्यांच्या आईला (मुलीच्या आजीला) विचारणा केली असता त्यांनी शेवटचा पेपर असल्याचे सांगून शाळेत गेल्याचे सांगितले. मात्र मुलगी घरी न परतल्याने त्यांनी शाळेतील शिक्षकांना, मुलीच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना फोन केला. मात्र त्यांना त्याबद्दल कुठलीही माहिती मिळाली नाही.

अखेर त्यांना मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत याबाबत रिपोर्ट दिला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई दिगंबर किनाके करीत आहे.

Comments are closed.