वाहतूक पोलिसांकडून खाजगी ट्रॅव्हल्स बसची तपासणी

जितेंद्र कोठारी, वणी: येथील वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी खाजगी ट्रॅव्हल्स बस तपासणीची मोहीम हाती घेतली. वाहतूक शाखा प्रमुख सपोनि सीता वाघमारे यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलिसांनी चंद्रपूर ते वणी, यवतमाळ मार्गे पुणे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसची कसून तपासणी केली. यात बसचे दोन्ही चालकांचा चालक परवाना, रजिस्ट्रेशन, पीयूसी इत्यादी कागद पत्रांची तपासणीसह चालकांची मद्य प्राशन चौकशी करण्यात आली.

तपासणी मोहीम दरम्यान वाहतूक कर्मचारी गोपाल हेपट यांनी बस मधील प्रवाश्यांना बसचे आपातकालीन दार (Emergency Exit) व प्रवासादरम्यान काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली. सपोनि सीता वाघमारे यांनी बस चालकांना समृध्दी महामार्गावर बस सावकाश चालविण्याची तंबी दिली.

काही दिवसांपूर्वी समृध्दी महामार्गावर बुलडाणा जवळ ट्रॅव्हल्स बसचा अपघात होऊन 25 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. नागपूरहून पुणे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले. ह्या दुर्देवी घटनेनंतर परिवहन व वाहतूक विभागाने राज्यातील सर्व खाजगी बसची तपासणी मोहीम राबविली.

चंद्रपूर ते पुणेसाठी प्रसन्ना ट्रॅव्हल्स, डीएनआर ट्रॅव्हल्स, विदर्भ ट्रॅव्हल्स, महालक्ष्मी ट्रॅव्हल्स, एआरबी ट्रॅव्हल्सच्या तब्बल 8 वातानुकूलित स्लीपर कोच बस दररोज वणी मार्गे धावतात. शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शेकडो विद्यार्थी व कर्मचारी या ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करतात.

Comments are closed.