थक्क करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कला प्रदर्शनांनी प्रेक्षक अवाक

मॅकरून स्कूलमध्ये गाजले 'द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन

निकेश जिलठे, वणी: एकेक विद्यार्थी स्टेजवर आपल्या कलेचा प्रदर्शन करत होता. त्यांच्या प्रतिभासंपन्न कलांच्या सादरीकरणाने रसिक थक्क झालेत. अवाक झालेत. मंत्रमुग्ध झालेत. उपस्थित रसिक प्रेक्षकांनी या दमदार विद्यार्थी कलावंतांना भरभरून दादही दिली. निमित्त होते शहरातील प्रसिद्ध मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई स्कूलच्या ‘द रिदम् वे टू एक्स्प्रेस’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, अध्ययन-अध्यापनाबरोबरच, शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम मॅक्रोन स्कूल द्वारे राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दिनांक 31 जानेवारी रोजी स्नेहसंमेलन सोहळा स्थानिक एस.बी.लॉन मध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक शिक्षणमहर्षी पी.एस.आंबटकर होते. या वार्षिक समारंभात प्ले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी एकांकिका, गायन, पारंपारिक नृत्य, कोळीगीते आणि देशभक्तीपर गीते, झांशीच्या राणीचे ऐतिहासिक प्रसंग, आईचे प्रेम, सायबर क्राईम यासारख्या सामाजिक उद्बोधन करणाऱ्या कार्यक्रमांची प्रस्तुती झाली. तर दमलेल्या बाबाची कहाणी यासारख्या मनाला स्पर्श करणाऱ्या भावनिक तसेच हेराफेरी सारख्या हास्याचे फवारे उडवणाऱ्या थीम मधून चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मने जिंकून घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी विधानसभेचे नवनियुक्त आमदार संजय देरकर व शाळेचे उपसंचालक पीयूष आंबटकर यांचा यावेळी विशेष सत्कार झाला. प्रमुख पाहुणे म्हणुन वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, वाहतूक शाखा प्रमूख सिता वाघमारे, डायरेक्टर ऑफ एम.एस.पी.एम अंकिता आंबटकर, डायरेक्टर ऑफ पॅरमाऊंट प्रांजली रघताटे, डायरेक्टर ऑफ सोमय्या पायल आंबटकर, वणी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना आणि एम.एस.पी.एम ग्रुपचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. या मान्यवरांचे आरंभी स्वागत करण्यात आले. संस्थेचा आणि मायक्रोन स्कूलचा देदीप्यमान कालखंड मुख्याध्यापिका शोभना यांनी मांडला.

पालकांनी पाल्यांना प्रोत्साहित करावे – पी.एस. आंबटकर
पालक फक्त आपल्या पाल्यांच्या शालेय अभ्यासावरच लक्ष केंद्रित करतात. परंतु त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा यासारख्या इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांना झेप घेण्यास प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. आजची विद्यार्थ्यांची कला पाहून यात भविष्यातील मोठे कलावंत दडलेले असल्याचे लक्षात आले. जे आपल्या शाळेचे तसेच परिसराचे नाव नक्कीच उंचावणार यात तिळमात्र शंका नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शाळा नेहमीच प्रोत्साहित करणार. तसेच पालकांनीही त्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात पी. एस आंबटकर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शोभना यांनी केलें. तर अर्चना व रूपाली यांनी सूत्रसंचालन करून मान्यवर तथा पालकांच्या तोंडून वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कमिटी यांच्या मार्गदर्शनात झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक तसेच मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments are closed.