खळबळजनक – भालर येथे महिला वकिलाला मारहाण करून विनयभंग

केस मागे घेण्याच्या दबावातून कृत्य... आरोपीवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: भालर येथील रहिवासी असलेल्या व नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करणा-या महिला वकिलावर चाकू उगारून मारहाण करण्यात आली. ही घटना भालर वसाहतीमध्ये मंगळवारी दिनांक 17 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी सुनील भाऊराव मोहितकर (56) याच्या विरोधात मारहाण, विनयभंगासह विविध कलमान्वये शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिला या वकील आहेत. त्या नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. तसेच त्या सामाजिक कार्यातही अग्रेसर असून त्या महिलांच्या तक्रारीत मदत करतात. पाच महिन्याआधी त्यांनी एका महिलेला तक्रार करण्याबाबत मदत केली होती. तसेच त्या महिलेची केस देखील यांच्याकडेच आहे. या केसवरून त्यांना अनेकदा धमकी देखील आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मंगळवारी दिनांक 17 मार्च 2026 रोजी त्या सकाळी सुमारे 11.00 वाजताच्या दरम्यान त्यांच्या 2 वर्षीय मुलीला बाबागाडीतून परिसरात फिरवत होत्या. दरम्यान तिथे आरोपी सुनील भाऊराव मोहितकर (वय 56, रा. जैन लेआउट, वणी) हा आला. त्याने वकिलासोबत वाद घातला. वाद घालत सुनील याने चाकू उगारला व वकिलाला मारहाण केली. या घटनेत वकिलाच्या हाताला दुखापत झाली.

यावेळी आरोपीने केस मध्ये पडू नको, मी युनियनचा लीडर आहे. माझे कोणीही काही बिघडवू शकत नाही असे म्हणत त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. सोबत चिमुकली असल्याने महिला वकिलांनी वाद वाढवला नाही. दरम्यान तिथे गाडीचा आवाज आल्याने आरोपी पळून गेला. घटनेनंतर पीडितेने शिरपूर पोलीस स्टेशन गाठले.

त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. डॉक्टरांच्या अहवालानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 118(1), 74, 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनील महादेव दुबे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. आरोपी हा वेकोलि कर्मचारी असून कामगार युनियनचा लीडर असल्याची माहिती आहे.  (इमेज एआय जनरेडेट)

Comments are closed.