22 गावांतील मामा तलावाच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

ब्रिटिशकालीन तलावाला मिळणार नवसंजीवनी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा मतदारसंघातील 22 गावातील माजी मालगुजारी तलावाची (मामा) दुरुस्ती होणार आहे. तत्कालीन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पावसाळी अधिवेशनात मामा तलावाच्या दुरवस्थेची समस्या विधानसभेत मांडली होती. त्याची दखल घेत शासनाने 6 कोटींची तरतूद केली होती. याची निविदा प्रक्रिया आता सुरु झाली असून 24 तारखेला ही निविदा उघडली जाणार आहे. त्यानंतर या तलावांच्या कामाला सुरुवात होणार आहे. दुरुस्तीचा भोई समाज व शिंगाडा उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे. दुरुस्तीमुळे मतदारसंघातील ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व टिकण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया तत्कालीन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली.

कोणत्या गावातील तलावांचा समावेश?
यात मेंढोली, कोलेरा, बोरगाव, कोरंबी, निंबाळा, खांदला, साखरा (दरा), निळापूर, पिंपरी, महाकालपूर, सावर्ला, रासा, कायर, लालगुडा, मंदर, शिंदोला, तरोडा या वणी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. तर झरी तालुक्यातील मुकुटबन, कोसारा, डोंगरगाव, अडेगाव तर मारेगाव तालुक्यातील कानेडा या गावांचा समावेश आहे. झरी तालुक्यातील मामा तलाव शिंगाडा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.

गोंडीराजाने व ब्रिटिशांनी सिंचन व मस्तउत्पादनासाठी मामा तलाव बांधले. वणी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मामा तलाव आहेत. यातील काही गोंडीराजाने तर काही ब्रिटिशांनी बांधले आहेत. मात्र या तलावाचा मेनटनन्स नसल्याने या तलावाची दुरवस्था झाली आहे. देखभाल नसल्याने यात गाळ साचला आहे. या तलावाचा मुख्य उपयोग हा मत्स उत्पादनासाठी केला जातो. तर काही ठिकाणी  शिंगाड्याचे उत्पादन व कमळाचे देखील उत्पादन घेतले जाते.  

तत्कालीन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 2023 च्या पावसाळी अधिवेशनात वणी विधानसभा क्षेत्रातील मामा तलावाच्या दुरवस्थेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन जलसंधारण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्यात येईल असा शब्द दिला होता. त्यानंतर काही दिवसातच याला शासनातर्फे निधी मंजूर झाला होता. मात्र त्याची निविदा प्रक्रिया रखडली होती. तत्कालीन आ. बोदकुरवार यांनी याचा वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर याची निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे या तलावाच्या देखभालीचा प्रश्न आता सुटला आहे. त्यामुळे भोई समाज व शिंगाडा उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच यामुळे सिंचनाचा प्रश्न देखील काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

मामा तलावांचे अस्तित्व टिकणार – संजीवरेड्डी बोदकुरवार
परिसरातील अनेक तलावांची देखभाली अभावी दुरवस्था झाली होती. तलावात गाळ साचल्याने याची सिंचन क्षमता कमी झाली आहे. याचा मासेमारी तसेच शिंगाडा उत्पादनावर परिणाम होत आहे. या तलावावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. या तलावाची दुरुस्ती होणार असल्याने या तलावाला अस्तित्व टिकण्यास मदत होणार आहे. शिवाय हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
– माजी आमदार, संजीवरेड्डी बोदकुरवार

मुकुटबन येथील मामा तलाव प्रसिद्ध
मुकुटबन येथील मामा तलाव हा केवळ परिसरातच नाही तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. हा तलाव ब्रिटिशकालीन असून सुमारे 200 हेक्टरवर हा तलाव पसरला आहे. या तलावावर सुमारे 200 कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुकुटबन येथील सुमारे तलावात मत्स उत्पादन, शिंगाडा तसेच कमळाचे उत्पादन घेतले जाते. येथे उत्पादन होणारा शिंगाड चवदार असल्याने येथील शिंगाड्याची परिसरासह संपूर्ण विदर्भात तसेच तेलंगाणातही मोठी मागणी आहे. शिंगाड्याचे पीक घेतल्यानंतर येथे मासेमारी केली जाते. या तलावाला सर्वाधिक ४६,७४,४२९ रुपयांचा निधी मिळाला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.