विवेक तोटेवार, वणी: शुल्लक वादावरून दोघांनी रेस्टॉरन्टच्या मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. यात मॅनेजर जखमी झाला. आज सोमवारी दु. 12 वाजताच्या सुमारास एकता नगरमध्ये ही घटना घडली. आरोपीकडून चाकू व कोयता जप्त करण्यात आला. वार केल्यानंतर हल्लेखोर हाती लागला तर त्याचा साथीदार पळून गेला. हाती आलेल्या आरोपीला देखील मारहाण करण्यात आली. मारहाण करीतच त्याला पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या घटनेत तो देखील जखमी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, वणीतील एकता नगर येथे सिद्धीक रंगरेज यांचे सुलतान बिर्याणी नामक रेस्टॉरन्ट आहे. या दुकानात त्यांचा भाचा मो. रजा मो. वसिर रंगरेज (23) हा मॅनेजर म्हणून काम करतो. रविवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास मो. रजा हा रेस्टॉरन्ट बंद करून घरी जात होता. त्यावेळी एकता नगरच्या बोर्डजवळ त्याला निकेश विठ्ठल होले रा. काजीपुरा व त्याचा मित्र चेतन चिकटे रा. एकता नगर भेटले. तेव्हा ते दोघेही दारू पिऊन होते. त्या दोघांचा मो. रजा सोबत वाद झाला. वादात शिविगाळ करण्यात आली. त्यावर मो. रजा याने तुम्ही दारू पिऊन आहात, आपण उद्या बोलू असे म्हटले व तो तिथून निघून गेला.
आज सोमवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मो. रजा हा रेस्टॉरन्ट समोर उभा होता. दरम्यान तिथे निकेश व चेतन हे दोघे दुचाकी घेऊन आले. त्यांनी मो. रजा जवळ दुचाकी थांबवली. निकेश दुचाकीवरून उतरला व त्याने रात्री झालेल्या वादाचा विषय काढला. त्याने माफी मागण्यास सांगितले. मात्र मो. रजा याने माझी काही चूक नसल्याचे सांगत माफी मागण्यास नकार दिला. त्यावर निकेशने शर्टच्या मागे लपवलेला चाकू बाहेर काढला व मो. रजावर वार केला. चाकूचा वार पाठीवर लागला. हल्ला होताच मो. रजाने ‘मामा बचाओ मामा बचाओ’ असा आरडाओरडा केला . त्याचवेळी काउंंटरवर बसलेले रेस्टॉरन्ट मालक व मो. रजाचे मामा सिद्धीक रंगरेज बाहेर आले.
वार करणारा लागला हाती, साथीदार पसार
सिद्धीक याने धाव घेत निकेशच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्याच्याजवळ आणखी एक कोयत्यासारखे हत्यार होते. दोन्ही हत्यार हिसकावून सिद्धीक यांनी निकेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरड बघून निकेश याचा साथीदार चेतन हा गाडी स्टार्ट करून लगेच पसार झाला. मात्र निकेश हाती लागला. त्याला हत्यारासह पोलीस स्टेशनला आणून जमा करण्यात आले.
या घटनेत मो. रजा हा थोडक्यात बचावला. त्याच्या पाठीवर जखम झाली. तर वार केल्यानंतर निकेश होले हा हाती लागल्याने त्याला मारहाण करण्यात आली. या तो देखील जखमी झाला आहे. मो. रजा यांच्या तक्रारीवरून आरोपी निकेश होले व आरोपी चेतन चिकटे या दोघांवर बीएनएसच्या कलम कलम 118 (1), 352., 351 (2), 351 (3), 3 (5), शस्र अधिनियम 4 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सीमा राठोड करीत आहे.
कुत्र्याला फिरवायला गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर नेली भरधाव बस
Comments are closed.