ऑनलाईन चिरीमिरी पडली महागात, महिला फौजदार निलंबित

लाच, चिरीमिरी, चहापाण्याची पद्धत झाली हायटेक

बहुगुणी डेस्क, वणी: ऑनलाईन चिरीमिरी घेणे एका महिला फौजदाराला चांगलेच महागात पडले. अवघ्या 500 रुपयांच्या चिरीमिरीसाठी महिला फौजदाराचे निलंबन करण्यात आले. स्वाती दादाराव कुटे असे महिला कर्मचा-याचे नाव असून त्या वाहतूक विभागात कार्यरत आहे. दुचाकी चालनाचे अर्धे पैसे स्वत:च्या यूपीआय आयडीवर घेतल्याची तक्रार दुचाकी चालकाने केली होती. त्यावरून जिल्हा पोलीस अधिक्षकांनी ही कारवाई केली आहे.

शहरातील इंदिरा चौकातील आदर्श संजय गुरफुडे हा राहतो. 26 सप्टेंबर रोजी शहरातील श्याम टॉकीज परिसरात पोलीस कर्मचारी सागर सिडाम यांनी त्याची मोटारसायकल पकडून वणी पोलिस ठाण्यात नेली. दुचाकीचे चलान म्हणून एएसआय स्वाती कुटे हिने आदर्श गुरफुडे याला तिच्या फोन पेवर एक हजार रुपये टाकायला सांगितले. याचवेळी कुटे हिने वाहतूक पोलिसांना बोलावून आदर्शला 500 रुपयांचे चलान फाडायला सांगितले. उर्वरित 500 रुपये तिने परत दिले नाही.

चालानचे 1000 रुपये घेतले व रिसिप्ट 500 रुपयांची दिल्याने आदर्शने 500 रुपये परत मागितले. त्यावर कुटे यांनी त्याला दम दिला. या प्रकरणी आदर्श गुरफुडे यांनी 30 सप्टेंबरला रजिस्टर पोस्टद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. सोबतच स्वाती कुटे हिच्या फोन पेवर एक हजार रुपये पाठविल्याचा स्क्रीन शॉट व वाहतूक पोलिसांनी फाडलेल्या चलानाची प्रतही पाठविली. तक्रारीची शहानिशा करून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शनिवारी स्वाती कुटे यांना निलंबित केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चिरीमिरी, लाच झाली ऑनलाईन !
कारवाईच्या भितीने आधी एखाद्या मध्यस्थीकडे किंवा कार्यालयाबाहेर असलेल्या पानटपरी, चहाटपरी चालकाकडे लाच, चिरीमिरी जमा करायला लावायचे. मात्र ही पद्धत पण आता कालबाह्य ठरत आहे. सध्या दंडाची रक्कम एखाद्या यूपीआय आयडीवर पाठवायला सांगितली जाते. राज्यभरात लाच घेण्याचा या पद्धतीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर हा एक पुरावा होऊ शकतो. याची कल्पना असूनही ही पद्धत लाचखोर कर्मचारी वापरताना दिसत आहे.

 

Comments are closed.