प्रेमनगरमध्ये पोलिसांचा छापा, एका तरुणीची सुटका

तरुणीला जबरदस्ती ढकलले वेश्याव्यवसायात. 'मालकिनी'ला अटक

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील प्रेम नगर झोपडपट्टी परिसरात शनिवारी रात्री पोलिसाच्या पथकाने धाड टाकली. सामाजिक संस्थेच्या माहितीच्या आधारे धाड टाकत पोलिसांनी एका 22 वर्षीय तरुणीची सुटका केली. तर तिला वेश्याव्यवसायात ढकलणा-या 45 वर्षीय महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Prevention of Immoral Trafficking Act) गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

वणीतील प्रेमनगर येथे एका 22 मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलल्याची माहिती ‘फ्रीडम फर्म’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), वणी यांनी पथक तयार केले. त्यांच्या सूचनेनुसार, शनिवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास मारेगाव येथील पोलीस निरीक्षक खुशाल बेसरकर हे पथकासह प्रेमनगर येथे गेले. या पथकाने सापळा रचून एक बनावट ग्राहक (पंटर) लक्ष्मी शिसोदिया (45) हिच्या घरी पाठवला.

लक्ष्मी सिसोदिया हिने 300 रुपयात सौदा फिक्स केला व एका 22 वर्षीय तरुणीला ग्राहकासोबत जाण्यास सांगितले. ठरलेल्या संकेतानुसार पंटरने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. यावेळी लक्ष्मी शिसोदिया तेथे आढळून आली. त्यांच्या अंगझडतीदरम्यान 300 रुपये आढळले व एक 22 वर्षीय तरुणी आढळली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पीडित तरुणीच्या चौकशीतून लक्ष्मी शिसोदिया हिने तिला धमकावून वेश्या व्यवसायात ढकलले अशी माहिती समोर आली. या प्रकरणी लक्ष्मी शिसोदिया हिच्याविरुद्ध BNS च्या कलम 143, 144(2) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर करत आहेत.

Comments are closed.