खळबळजनक – रासा येथे राडा… मेहुण्याला बेदम मारहाण करून अपहरण

दोन गाड्या भरून आलेत लोक, साळा व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: पती पत्नीच्या किरकोळ वादातून पत्नी माहेरी परत आली. यावर चिडलेल्या साळ्याने दोन गाड्या भरून साथीदार सोबत घेत थेट गाव गाठले. त्यांच्या टोळीने गावात जाऊन राडा केला. साळ्याने त्याच्या मेहुण्याला व बहिणीच्या सासुला बेदम मारहाण करीत मेहुण्याचे अपहरण केले. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील रासा येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मारहाण व अपहरण केल्या प्रकरणी साळा व त्याच्या साथीदारांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

तक्रारीनुसार, सौ. गंगूबाई प्रकाश शिंदे या रासा येथील रहिवासी आहे. त्यांचे एकत्र कुटुंब आहे. ते त्यांचे पती प्रकाश, मोठा मुलगा सुभाष (30) व धाकटा मुलगा उमेश (28) यांच्यासह राहतात. रविवारी दिनांक 16 मार्च रोजी दुपारी त्यांच्या थोरला मुलगा सुभाष याचा व त्याच्या पत्नीचा किरकोळ वाद झाला. त्यामुळे सुभाषची पत्नी माहेरी वरोरा येथे निघून गेली. दरम्यान मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर दोन फोर व्हिलर आल्यात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एवढ्या रात्री कोण आले म्हणून सुभाष गाडीजवळ गेला. तेव्हा त्याचा साळा मोहन केशव कुचनकर (25) रा. वरोरा हा एका गाडीतून खाली उतरला. त्याच्या पाठोपाठ दोन्ही गाडीतून सहा ते सात व्यक्ती हातात लाठी काठी घेऊ उतरले. त्यांनी गाडीतून खाली उतरताच सुभाषला शिविगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान सुभाषची आई गंगूबाई मध्ये आल्या. मात्र त्यांना देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. मोहनने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने गंगूबाईंना मारहाण करण्यास सुरुवात केली.

गावात राडा होताना पाहून शिंदे यांच्या घराशेजारील लोक मध्यस्थी करण्यास आले. त्यांनी मारहाण करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आलेल्या लोकांनी शेजा-यांना मध्ये पडू नका, अशी धमकी दिली. त्यानंतर मोहन व त्याच्या साथीदारानी सुभाष याला गाडीत टाकले व ते त्याला सोबत घेऊन गेले. घाबरलेल्या शिंदे कुटुंबीयांनी पहाटे वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मोहन केशव कुचनकर व त्याच्या साथीदारांविरोधात 118(1), 137 (2), 189(2) 190 191(2) 191(3) 351(2) 351(3) 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.