बहुगुणी डेस्क, वणी: वणी-माजरी रेल्वे मार्गावरील नायगाव गावाजवळ मालगाडीची एका तरुणाला धडक बसली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 13 मार्च 2026 रोजी रात्री 12:20 वाजताच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव अद्वैत विजय माळीकर (वय अंदाजे 24-25 वर्षे), राहणार विद्या नगर, नांदेपेरा रोड, वणी असे आहे.

अद्वैत हा वणी बसस्थानकासमोर टी-स्टॉल चालवत होता. तर त्याचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहे. शुक्रवारी माळीकर कुटुंब मोठ्या मुलाच्या उपचारासाठी नागपूर येथे गेले होते. मध्यरात्री अद्वैत हा नायगाव रेल्वे रुळांजवळील जवळ होता. रात्री 12.30 वाजताच्या सुमारास चंद्रपूर विद्युत प्रकल्पासाठी एक मालवाहू कोळसा घेऊन जात होती. दरम्यान अद्वैत अचानक रेल्वे समोर आला. रेल्वेखाली कटून त्याचा जागीच मृत्यू झाला.
एका रात्रीत माळीकर कुटुंबावर दुहेरी आघात
शुक्रवारी रात्री अद्वैतचा मोठा भाऊ श्रेयश माळीकर (वय 30) हा दुचाकीने कोलवाशरी येथे कामावर जात असताना निळापूर-ब्राह्मणी मार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यामुळे आई-वडील श्रेयशसोबत नागपूरला गेले होते. दरम्यान, त्याच रात्री नायगावजवळ रेल्वे धडकेत अद्वैतचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी कुटुंबाला मिळाली. एका रात्रीतच दोन मुलांवर संकट कोसळल्याने माळीकर कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लोको पायलटने तरुण रेल्वेखाली आल्याचे समजताच गाडी थांबवली आणि वणी रेल्वे स्टेशन मास्टरला घटनेची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलीस (RPF) आणि वणी पोलीस यांना सूचना देण्यात आली. दोन्ही पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
रेल्वे रुळ ओलांडताना अपघात झाला की आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय नागपूरहून तात्काळ वणीला परतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वडतकर करीत आहेत. स्थानिक पातळीवर या घटनेने शोकाचे वातावरण पसरले आहे.



Comments are closed.