बहुगुणी डेस्क, वणी: शासनाने सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक उपक्रम राबविलेत. काही अजूनही सुरूच आहेत. त्यातीलच एक म्हणजे, राष्ट्रीय आरोग्य अभियान. मात्र इथं राबराब राबणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन मिळत नाही. गेली अनेक वर्षे ते अतिशय तुटपुंज्या वेतनावर आपली आरोग्य सेवा देत आहेत.
कोरोनासारख्या अतिशय भयावह परिस्थितितही आपल्या जिवाची व कुंटुंबाची पर्वा न करता या अधिकारी व कर्मचारी वर्गाने सेवा दिलेली आहे. अनेकदा त्यांना कोरोनायोध्दा म्हणून देखील गौरविण्यात आले. परंतु नियमीत किंवा परमनंट कर्मचारी यांच्या वेतनाचा जर विचार केला, तर कंत्राटी कर्मचारी यांच्या वेतनात मोठी तफावत आहे.
शिवाय दोन्ही कर्मचाऱ्यांना कामे मात्र सारखीच आहेत. मग हा भेदभाव का केला जातो? असा सवाल कायम आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून सर्व एंट्री ऑनलाईन कराव्या लागतात. शिवाय कामाचा व्याप मोठया प्रमाणावर वाढलेला आहे. माहीती आताच द्या, नाहीतर तुमच्यावर कार्यवाही करण्यात येईल. अशी ताकीद दिली जाते.
शिवाय कंत्राटी सेवा असल्यामुळे नोकरीची शाश्वती नाही. या भीतीपोटी रात्र न् दिवस कामे करावी लागतात. शिवाय या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुट्टी देखील देताना भेदभाव करण्यात येतो. वर्षातून केवळ 15 सुट्या त्यांना घेता येतात. त्यातही काही कारणास्तव सुटी घेतली, तर ती विनावेतन करण्यात येते. अशा प्रकारे मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून या कंत्राटी वर्गाची पिळवणुक करण्यात येत आहे.
यातच 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णयानुसार 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांची सेवा नियमीत करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुशंगाने एकुण 71 संवर्गांपैकी केवळ दोनच संवर्गांना ऑर्डर देण्यात आली होती.
परंतु उर्वरीत जवळपास 69 संवर्ग हे मागील एका वर्षापासून समायोजन करण्याच्या ऑर्डरची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. परंतु अद्यापही त्यांच्या पदरी घोर निराशा मिळालेली आहे. म्हणूनच वणी येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी वणी विधानसभा येथील आमदार संजय देरकर यांना भेटून आपली समस्या सांगितली. हा विषय अधिवेशनात सादर करण्याकरिता विनंती केली. त्यामुळे आमदार संजय देरकर यांनी सदर समायोजनाचा व वेतन सुसूत्रिकरणाचा विषय अधिवेशनात मांडला.
त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून कृतज्ञता व्यक्त होत आहे. यावेळी आभार व्यक्त करताना डॉ. शिरीष ठाकरे, आयुष विभागाचे डॉ. विवेक गोफणे, डॉ. अरुण विधाते, क्षयरोग विभागाचे पर्यवेक्षक मारोती पुनवटकर, एक्स रे तंत्रज्ञ सविता तंतरपाळे, कुष्ठरोग विभागाचे सी. आर. वालदे, नीता बदकुले, शोभा वानखेडे, दीपाली दासुरे, प्रतिभा रामटेके, ममता चव्हाण, मंजूषा मांडवकर, सिंधू जगताप, आरती आठवले, रोशनी बागडे हजर होते.
Comments are closed.