वाहतुकीस अडथळा असलेले ‘ते’ खांब अखेर जमीनदोस्त

अर्धवट राहिलेल्या सिमेंट रस्त्याचे काम लवकरच होणार सुरु

जितेंद्र कोठारी, वणी : साईमंदिर ते चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग पर्यंत बांधकाम सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम आता लवकरच पूर्ण होणार आहे. अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वीज खांब अखेर काढण्यात आले आहे. सिमेंट रस्त्याच्या मधोमध असलेली वीज वाहिनी शिफ्टिंग करण्याचे काम खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. मात्र महावितरण अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे मागील 6 महिनेपासून वीज खांब हटविण्यास विलंब झाले.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर चौकापर्यंत 4 कोटीच्या निधीतून रुंदीकरणसह चौपदरीकरण सिमेंट काँक्रीट रस्ता, डिव्हायडर व ड्रेनेजचे काम करण्यात येत आहे. रस्ता रुंदीकरण करताना नटराज बिल्डिंग मटेरियलच्या दुकानापासून तर मणीप्रभा टॉवर कॉम्प्लेक्स पर्यंत अनेक विद्युत खांब व डीपी रस्त्याच्या मधोमध आले. विद्युत वाहिनी व खांब स्थलांतर करण्यासाठी बांधकाम विभागाने खाजगी विद्युत कंत्राटदाराला कंत्राट दिले.

वीज वाहिनी स्थलांतरण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी विद्युत पुरवठा बंद करण्याची मागणी महावितरण कार्यालयात केली. मात्र वारंवार पत्र देऊनही महावितरण कडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. वाहतुकीस अडथळा आणणारे वीज खांब हटविण्यात दिरंगाई होत असल्यामुळे अटारा ऑटोमोबाईल ते कमल इलेक्ट्रॉनिक या दुकानापर्यंत वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. आता दुसऱ्या बाजूने रस्ता वाहतुकीस मोकळा झाला आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे.

वाहतुकीस अडथळा उत्पन्न करणारे व धोकादायक वीज खांब काढण्यात आले आहे. उर्वरित रस्ता व डिव्हायडरचे बांधकाम येत्या काही दिवसात पूर्ण होईल.
तुषार परळीकर – कार्यकारी अभियंता, सा. बा. विभाग पांढरकवडा

Comments are closed.