ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्र नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात

सामाजिक कार्यकर्त्यांची ब्लड टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्र नसल्याने रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकर ब्लड रिपोर्ट न आल्याने रुग्णांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वणी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरात लवकर ब्लड टेस्ट सेन्टर सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिक्षकांमार्फत जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन दिले आहे.

सध्या साथीच्या रोगाचे थैमान परिसरात आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजार असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालयात येत आहे. ग्रामीण रुग्णालयात अशा संशयीत रुग्णांचे सॅम्पल घेतले जाते. हे सॅम्पल पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. हा रिपोर्ट येण्यास 4 ते 7 दिवस लागतात. विहीत कालावधीत रिपोर्ट प्राप्त न झाल्यास रुग्णाच्या आजाराचे निदान होण्यास उशिर होत आहे. परिणामी रुग्णाचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

07 ऑक्टोबर रोजी डेंग्युच्या एका संशयीत रुग्णाचे रक्त तपासणीचे सॅम्पल पांढरकवडा येथे पाठवण्यात आले. हा अहवाल 4 ते 6 दिवसांनी प्राप्त होणार होता. परंतू दोन दिवसातच रुग्णाला त्रास वाढल्याने रुग्णाने एका खासगी रुग्णालयाच्या लॅबमध्ये रक्त तपासणी केली. त्यात सदर रुग्ण हा डेंग्यू पॉजिटिव्ह निघाला. मात्र वेळीच निदान झाल्याने रुग्णाला वेळीच उपचार झाला. असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गाडगे, देवानंद झाडे, राकेश तावाडे, रज्जत सातपुते, रविंद्र कांबळे, दिनेश रायपुरे , नरेंद्र वाळके उपस्थित होते.

Comments are closed.