जितेंद्र कोठारी, वणी: संतोष गोमकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. संतोषचा मृत्यू हा घातपात असून हा मृत्यू ऑन ड्युटी झाला आहे. त्यामुळे कंपनीने एका आठवड्याच्या आत मृतकाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. या घटनेला तीन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र प्रकरणाचा तपास धिम्या गतीने होत असल्याने अद्याप या प्रकरणी कोणतेही धागेदोर गवसत नसल्याचा आरोपही काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. यासंबंधी मंगळवारी डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृ्त्वात उपविभागीय अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले.
संतोष रामदासराव गोमकर हे महा मिनरल माईनिंग प्रा. लि. या कंपनीतील पिंपळगाव/वणी प्लान्ट येथे साईट सुपरवायजर या पदावर कार्यरत होते. दिनांक 8 रोजी संतोष यांची नाईट शिफ्ट होती. रात्री संतोष ड्युटीवर गेले होते. मात्र दुस-या दिवशी ते घरी परतले नाही. दुस-या दिवशी कोराडी रेल्वे साईडिंग येथे त्यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल व मोटारसायकल या वस्तू वणी येथील कार्यालयातच होत्या. त्यामुळे हा प्रकार घातपात असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून काँग्रेसने केली आहे. या बाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
संतोष हे घरातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने संतोष यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. त्यांची हत्या ड्युटी झाली आहे. शिवाय यास कंपनीची सुरक्षा व्यवस्था जबाबदार असल्याने कंपनीने एका आठवड्याच्या आत नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कंपनीला व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
जर कंपनीने एका आठवड्यात आर्थिक मदत न दिल्यास काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी डॉ. महेंद्र लोढा, ओम ठाकूर, आबिद हुसेन, प्रमोद इंगोले, सलीम खान, प्रशांत गोमकर, जय आबड यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.