दीपक चौपाटी ते शाम टॉकीज रोडवर खड्डेच खड्डे

नागरिक संतप्त, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या काही काळापासून शहरात विकास कामाचा सपाटा चालू आहे. मात्र हा विकास काही मोजक्या भागाचाच केला जात असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. शहरातील दीपक चौपाटी ते शाम टॉकीज हा वरदळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.

दीपक चौपाटी ते शाम टॉकीज मार्गांवर भाजी मंडी, नगरपरिषद, मुख्य बाजारपेठ, दोन शाळा, मंदिर इत्यादी आहेत. याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. जत्रा मैदानावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. यामुळे या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. भालर, मंदर, शिरपूर या गावाला देखील याच मार्गांवरून जावे लागते. हा एक प्रमुख वरदळीचा मार्ग आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सध्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे रोजच छोटे अपघात होत आहेत. नगरपालिकेने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.