विषारी सापाचा बापलेकाला दंश, बाळाचा मृत्यू, वडील गंभीर

शात्रीनगर येथील घडली, वडीलांची मृत्यूशी झुंज सुरू

 

बहुगुणी डेस्क, वणी: विषारी सापाने वडिलांना व त्याच्या दिड वर्षांच्या चिमुकल्याला दंश केला. यात बाळाचा मुत्यू झाला. बुधवारच्या मध्यरात्री पहाटेच्या सुमारास शास्त्रीनगर येथे ही घटना घडली. दक्षित सुमीत नेलावार असे मृत बालकाचे नाव आहे. तर वडिलांची मृत्यूशी झुंज सुरु असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुमीत नेलावार (34) हा वणीतील शास्त्रीनगर मोक्षधाम येथील रहिवासी आहे. तो पत्नी, एक मुलगी व एक मुलगा (16 महिने) राहतो. तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी दिनांक 23 जुलै रोजी घरातील सर्व नेहमी प्रमाणे झोपले होते. एका गादीवर आई व मुलगी तर दुस-या गादीवर वडील व चिमुकला झोपला होता.

रात्री 2 वाजताच्या सुमारास बाळाने रडायला सुरुवात केली. त्यामुळे वडीलांनी झोपवण्यासाठी छातीला थोपटण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान वडिलांना मुलाचे छाती ठोके वाढलेले दिसले. याच वेळी सापाने वडिलांनाही चावा घेतला. दोघांनाही सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच वडिलांनी पत्नीला उठवले. शेजारी जागे झाले. शेजा-यांच्या मदतीने दोघांनाही वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने दोघांनाही चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.

मध्यरात्री पोहोचले सर्पमित्र
साप अंथरुणात असल्याने शेजा-यांनी तात्काळ वणीतील सर्पमित्र हरिष कापसे यांना दिली. त्यांनी तातडीने आपली टिम घटनास्थळी पाठवली. काही वेळातच सापाला पकडण्यात आले. सदर दंश करणारा साप मन्यार असल्याचे आढळून आले.

वणीहून चंद्रपूर येथे नेत असताना वाटेतच चिकुकल्याची प्राणज्योत मालवली. गंभीर अवस्थेत असलेल्या वडिलांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वडिलांची प्रकृती अद्यापही चिंतित आहे. मुलावर दुपारीच शोकाकूल वातावरणात चंद्रपूर येथे अत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रुग्णालयात विष प्रतिरोधक औषधी उपलब्ध नाही
विषारी साप चावल्यास दंश झालेल्या व्यक्तीला तातडीने विष प्रतिरोधक इंजेक्शन (अँटी वेनम) दिले जाते. यामुळे दंश झालेल्या व्यक्तीचा प्राण वाचण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. मात्र वणीतील ग्रामीण रुग्णालयात ही औषधी नसल्याने रुग्णाला इतर ठिकाणी रेफर करावे लागते. यात बराच वेळ जात असल्याने सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव जातो.

Comments are closed.